Vistadome Coach Train : भारतात रेल्वे प्रवास खूप लोकप्रिय आहे, कारण इतर देशांच्या तुलनेत भारतात प्रवास खूप स्वस्त आहे. जेव्हा भारतीय ट्रेन पर्वत आणि घनदाट जंगलातून जाते तेव्हा आजूबाजूचे दृश्य पाहून पर्यटकांचे मन नक्कीच प्रसन्न होते. जर तुम्हाला प्रवास करायला आवडत असेल, पर्वतरांगांच्या मधून चित्तथरारक अनुभव घ्यायचा असेल तर लवकर बॅक पॅक करा कारण मान्सून जोरात सुरू झाला आहे. पावसाच्या सरींचे आगमन होवून एक महिना झाला आहे आणि निसर्गाने रंगिबेरंगी फुलांसह हिरवीकंच शाल पांघरली आहे. (Book these 6 trains with Vistadome Coach and make your Western valley journey )
देश विदेशात फिरत असाताना तुम्ही महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतराजीचे सौंदर्य पाहिले आहे का? नसल्यास, आम्ही तुम्हाला ते पाहण्याचा सर्वोत्तम मार्ग सांगणार आहोत. म्हणजे आज आम्ही तुम्हाला मध्य रेल्वेच्या 6 गाड्यांबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये व्हिस्टाडोम कोच बसवले आहेत. ज्यामुळे तुम्हाला नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेता येईल. तसेच तुम्ही गोव्याला जाण्याचा विचार करत असाल तर किंवा मुंबई ते गोवा असा प्लॅन करत असाल तर या ट्रेन तुमच्यासाठी पावसाळ्यात बेस्ट पर्याय ठरू शकतात.
पावसाच्या दिवसात विस्टाडोम कोचने प्रवास करायला कोणताही निसर्गप्रेमी नाही म्हणणार नाही आणि यासाठी तुम्हाला पैसे ही जास्त द्आवे लागणार नाही. पण या प्रवासातला आनंद आणि मजा तुमच्या ट्रीपमध्ये दुप्पट तिप्पट हॅप्पीनेस घेवून येईल. यामुळे तुमची मुंबई-गोवा ट्रिप आणखी रोमांचक, संस्मरणीय आणि मजेदार होईल. भारतात अशा अनेक व्हिस्टाडोम ट्रेन धावत आहेत, ज्यामध्ये तुम्ही अतुल्य भारत पाहू शकता.
पश्चिम घाट म्हणजेच सह्याद्रीची पर्वतरांग आपल्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. मुंबईहून गोव्यात जाण्यासाठी तुम्हाला ही पर्वतरांग ओलांडावी लागते. पावसाळ्यात तुम्ही या मार्गावरून प्रवास केल्यास हिरवाईने तुमचे स्वागत होईल. लहान-मोठ्या टेकड्या, शेकडो मोठमोठे धबधबे आणि उडणाऱ्या ढगांच्या या मंत्रमुग्ध करणाऱ्या रांगेतून तुमची नजर हटणार नाही. ही पर्वतराजी गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेपासून सुरू होते आणि गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमधून जाते. 2012 मध्ये कन्याकुमारी येथे UNESCO ने पश्चिम घाट क्षेत्रातील 39 ठिकाणे जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित केली आहेत.
विस्टाडोम कोचमध्ये काचेचे छत असून अतिशय मोठ्या आणि अतिशय पारदर्शक खिडक्या आहेत, ज्यामुळे निसर्ग पाहण्याचा एक वेगळा अनुभव मिळेल. त्यातील सीट्स 180 डिग्री पर्यंत फिरतात, ज्यामुळे तुम्ही उठून किंवा न उठताही आरामात डावीकडे उजवीकडे फिरू शकता.
सह्याद्री पर्वतराजी पाहण्यासाठी मध्य रेल्वेवरून धावणाऱ्या या 6 गाड्यांची तुम्ही बुकिंग करू शकता, ज्यात विस्टाडोम डबे आहेत. यामध्ये मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस, मुंबई-पुणे डेक्कन क्वीन, मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेस, पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस आणि मुंबई-करमाळी तेजस एक्सप्रेस या सात विस्टाडोम गाड्यांचा समावेश आहे.
विस्टाडोम कोच कसा बुक करायचा?
- यासाठी प्रथम तुम्हाला IRCTC वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.
- लॉगिन केल्यानंतर स्थानकांवरून ये-जा, प्रवासाची तारीख इत्यादी माहिती द्यावी लागेल.
- यानंतर तुम्हाला व्हिस्टाडोम कोच बुक करण्यासाठी वर्ग विभागात फक्त एसी चेअर कार किंवा एक्झिक्युटिव्ह चेअर कार निवडावी लागेल.
- तुमची सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला ‘Book Now’ वर क्लिक करावे लागेल.
- विस्टाडोम कोचचे तिकिट भाडे जवळपास शताब्दी ट्रेनच्या बरोबरीचे आहे आणि त्यात कोणतीही सवलत नाही.
विस्टाडोम कोच तिकिटाची किंमत
भारतीय रेल्वेच्या परिपत्रकानुसार, विस्टाडोम एसी कोचचे मूळ भाडे शताब्दी एक्स्प्रेस ट्रेनच्या मूळ भाड्याच्या 1.1 पट आहे. आरक्षण शुल्क, सुपरफास्ट शुल्क, वस्तू आणि सेवा कर (GST) इत्यादी इतर शुल्क स्वतंत्रपणे आकारले जातील. विस्टाडोम कोचच्या भाड्यात कोणतीही सवलत नाही आणि सर्व प्रवाशांकडून पूर्ण भाडे आकारले जाते. विस्टाडोम कोचमध्ये, सामान्य मुलांचे भाडे नियम लागू होतात. व्हिस्टाडोम कोचसाठी रद्दीकरण आणि परतावा नियम एक्झिक्युटिव्ह क्लासप्रमाणेच राहतील. पर्यटनाला चालना देण्यासाठी या विस्टाडोम ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत.