योगेश आलेकरी. महाराष्ट्राच्या कडेगाव तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील एक प्रवास वेडा तरुण. आधी महाराष्ट्र मग भारत अन् भारताच्या आजूबाजूचे देश त्याने बाईकवरुन पालथे घातले आणि आता हाच तरुण बाईकवरुन जगाच्या सफरीवर गेला आहे. आज (27 जुलै) त्याचा हा प्रवास सुरु झाला आहे. यात रोज 300 किलोमीटर या प्रमाणे चार महिन्यांमध्ये, दोन खंड आणि जवळपास 27 देश तो फिरणार आहे. एकूण 25 हजार किलोमीटरचा हा प्रवास होण्याचा त्याचा अंदाज असून तो संपवून डिसेंबरपूर्वी भारतात परत येणार आहे. (Yogesh Alekari will travel to two continents and around 27 countries in four months)
दोन खंड अन् 27 देश :
योगेश इथून इराणला जाणार आहे. तिथे 10 दिवस फिरल्यानंतर तिथून अर्मेनिया, जॉर्जिया, टर्की, ग्रीस, बल्गेरिया, सरबिया, कोसोवो, मॉन्टेनोगोरो, अल्बानिया, बोस्निया, क्रोएशिया, स्लोव्हेनिया, ऑस्ट्रिया, झेक, जर्मनी, लिक्टनस्टीन, स्वित्झर्लंड, इटली, व्हॅटिकन, सॅन मॅरिनो, लक्झमबर्ग, फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड, इंग्लंड , स्कॉटलंड, अशा तब्बल आशिया आणि युरोप खंडातील तब्बल 27 देशांमध्ये तो भेट देणार आहे.
या मोहिमेत डॉक्युमेंटेशन हे सर्वात मोठं दिव्य :
व्हिसा मिळविण्यासाठी तब्बल 1 वर्ष धडपड :
27 देशांना भेट देण्यासाठी लागणारा व्हिसा मिळविण्यासाठी योगेशला 1 वर्ष प्रयत्न करावे लागले. काही व्हिसा त्याला मुंबईत मिळाले. तर काही दिल्लीत, काही इराणच्या कॉन्सुलेटमध्ये तर काही VFS global याठिकाणी त्याला व्हिसा मिळाले. (VFS ग्लोबलमध्ये खूप साऱ्या देशांचा व्हिसा एकाच ठिकाणी मिळतो) याशिवाय काही व्हिसांसाठी ऑनलाईनही अप्लाय करता आले होते. प्रत्येक देशाच्या व्हिसाच्या फीचा खर्चही बराच मोठा आला.
बाईक नेण्यासाठीची मोठा खर्च आणि प्रचंड कसरत :
बाईक नेण्यासाठीही योगेशला प्रचंड कसरत करावी लागली. बाईकचे परमिट एका ठिकाणी, इंटरनॅशनल लायसन्स आरटीओकडे, तर बाईकचा पासपोर्ट काढण्यासाठी त्याला चर्चगेटला जावं लागलं होतं. इथे कागदपत्र आणि बाकीच्या गोष्टी करताना योगेशची पुरेवाट झाली होती. हे दिव्य संपल्यानंतर प्रत्येक देशातील बाईकचा इन्शुरन्ससाठी त्याला वेगळे पैसे मोजावे लागले. काही देशांमध्ये 1 हजार, काही 5 हजार काही 10 हजार असा एक लाख रुपये त्याला इन्शुरन्ससाठी मोजावे लागले आहेत.
बाईकचे परमिट यालाच बाईकचे कारनेट असं म्हणतात. यासाठी बाईकच्या टोटल किंमतीच्या 200 टक्के डिपॉझिट असते. त्याशिवाय बाईकची 1 लाख फी आणि त्यावर 18 टक्के जीएसटी, असा बाईकच्या परमिटसाठीच त्याला जवळपास साडे तीन लाख रुपयांचा खर्च आला. हे सगळं झाल्यानंतर त्याला फिरण्यासाठी लागणाऱ्या पेट्रोलचा येणारा खर्च वेगळाच असणार आहे. यासोबतच बाईकचे रिटर्न शिपिंग हेही एक मोठे दिव्य असणार आहे.
तरच मिळणार डिपॉझिट परत :
योगेशने बाईकसाठी भरलेले डिपॉझिट परत मिळविण्यासाठीही खूपच कडक नियम पाळावे लागणार आहेत. बाईकच्या कारनेटसोबत त्याला एक बुकलेट देण्यात आले आहे. दिलेल्या वेळेत आणि व्हिसाच्या तारखेदिवशी प्रत्येक देशाचे अधिकृत शिक्के या बुकलेटवरती पडणे अत्यावश्यक असणार आहे. सोबतच कारनेट करताना भारतात बाईक कधीपर्यंत परत यायला हवी याची तारीखही त्याला दिली आहे. यावेळेत येऊन तो योग्य वेळेत कस्टम ड्यूटीसाठी हजर झाला तरच त्याला त्याचे डिपॉझिट परत मिळणार आहे. यात थोडं जरी इकडचं तिकडं झालं तर सगळं डिपॉझिट जप्त होण्याचा धोका असतो.
लोन काढलं, क्रेडिट कार्ड मारलं :
या सहलीसाठी योगेशला साधारण 23 ते 25 लाख रुपये खर्च येण्याचा अंदाज आहे. या पैशांची जुळवाजुळव करताना योगेशचा बराच कस लागला. यात त्याने त्याचे संपूर्ण सेव्हिंग पणाला लावले आहे. शिवाय कर्ज काढून, क्रेडिट कार्ड वापरुन आणि गरज पडेल ते करुन त्याने या ट्रिपसाठी पैसा उभा केला आहे. अशात गावी काही मेडिकल कारणांमुळे आणखी अडचण उभी राहिली होती. या सगळ्यांवर मात करत अखेर योगेश आपल्या ड्रीम जर्नीसाठी सज्ज झाला आहे.
1 मे रोजी करणार होता सुरुवात :
या आव्हानात्मक प्रवासाची सुरुवात 1 मे रोजी मुंबईतून होणार होती. मात्र प्रस्थनाची तारीख अगदीच जवळ आलेली असतानाही मध्य आशिया मधील काही देशांनी काही परवानग्या देण्यास विलंब केला. अशात घरी काही वैद्यकीय कारणांमुळे ट्रिपची तारीख पुढे ढकलावी लागली होती. बहुतेक देशांना बाईकवरुन भेट दिल्यानंतर, बाईकवर जगाची सहल करण्याचे माझे स्वप्न होते, असे योगेश सांगतो.
वयाच्या 20 व्या वर्षांपासून ट्रेकिंग आणि बाईकिंगची सुरुवात :
प्रवास आणि पर्यटन व्यवसायात असलेला योगेश स्पोर्ट्स बाईक रायडिंगची पॅशन बाळगून आहे. Adventure sports ची आवड असलेल्या योगेशने Mountaineering course उत्तमरित्या पूर्ण केला आहे. वयाच्या 20 व्या वर्षांपासून ट्रेकिंग आणि बाईकिंग सुरू केलेल्या योगेशने 12 वर्षात भारतातील 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात मिळून जवळपास 1,00,000 किलोमीटर बाईक राईडिंग केलं आहे. नॉर्थ ईस्ट आणि लेह-लडाख ही त्याची हक्काची ठिकाण आहेत.
योगेशने पूर्ण केलेला आजवरचा आव्हानात्मक प्रवास :
आजवर योगेशने किलार ते किष्तवाड हा सर्वात कठीण असा रस्ता, ज्याला cliffhanger म्हणतात तो सुद्धा बाईकने पार केला आहे. 17 हजार 582 फूट उंचीवर असलेला जगातील सर्वात उंच Motorable road असलेला खारडुंगला सुद्धा त्याने बाईकवर कव्हर केला आहे. जो झिला, तांगलांग ला, बुम ला, कुंजुम ला, सच पास, नाथुला पास हे सुद्धा त्याने कव्हर केलेले आहेत. इतकेच काय तर नेपाळ, भूतान, थायलंड, कंबोडिया आणि व्हिएटनामला सुद्धा त्याने बाईकवरुन भेट दिली आहे.