Valentine’s Day Special : गेल्या काही वर्षापासून मी काही गोष्टींकडे फक्त बारकाईने पाहत होती. या गोष्टींमध्ये सर्वात वरच्या स्थानी होते ते नाते, प्रेम, तत्व, काळानुरूप बदलणारे विचार. बदलत्या काळानुसार या सर्व गोष्टींमध्ये किती बदल झाला हे तुम्हालाही लक्षात आले असेल. अशात अचानक सोशल मीडियावर एक पोस्ट दिसली आणि सर्व विचारांनी पॉज घेतला. कारण काय तर प्रेमासाठी, आपल्या तत्वांसाठी आणि समाज परिवर्तनासाठी एका दाम्पत्याने उचलेलं पहिलं पाऊल.
मला माहिती आहे की आज प्रेमाचा दिवस आहे आणि जगभरात मोठ्या प्रमाणात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे. असं म्हणतात की प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं अन् तुमचं आमचं सेम असतं… पण खरं सांगू का भाऊ, प्रेम असतं खरं पण तुमचं आमच सेम नसतं… कारण प्रेमात लैला मजनूची उदाहरणं तुम्ही वाचली असतील पण आज मी तुम्हाला ज्योतिबा सावित्रीचा प्रेमळ विचार समाजात पेरणाऱ्या एका प्रेमीयुगुलाची गोष्ट सांगणार आहे. कारण सध्या आपल्या समाजाला हिर रांजा, आर्ची परशा नाही, तर सावित्री ज्योती, रमाबाई- भिमराव, अशा प्रेमीयुगुलांच्या विचारांची, परिवर्तन घडवणाऱ्या विचारांची गरज आहे.
ही कथा आहे सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील प्रविण शिंदे आणि त्यांची पत्नी प्रियंका सोनवणे यांची. दाम्पत्य अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील देवगाव व वेल्हाळे या गावचे रहिवासी आहे. प्रविण पत्रकारिता क्षेत्रात काम करतो, तर प्रियंका आगा खान फाऊंडेशनमध्ये बालविकास आणि पालकत्व या विषयावर काम करते. धार्मिक आणि पारंपारिक संस्कारात मोठे झालेले हे दोघेही शिक्षण घेऊन उंच भरारी घ्यायला गावाबाहरे पडले. बाहेर पडल्यानंतर त्यांच्या पंखांना सावित्रीबाई फूले आणि ज्योतिबा फूले अशा थोर समाजसुधारकांच्या विचारांचे बळ मिळाले. या थोरामोठ्यांचे विचार घेऊन जगणारे प्रविण याच क्षेत्राची आवड असलेल्या प्रियंकाला भेटले. आता पुढची कहाणी जाणून घेण्यासाठी आम्ही थेट प्रविण शिंदे यांच्याबरोबर संपर्क साधला. जाणून घेऊ या त्यांची सत्यशोधक विचारांची स्टिरिओटाइप तोडली जाणारी प्रेम कहाणी….
नमस्कार, मी प्रविण शिंदे…
तो काळ होता जेव्हा एका शैक्षणिक प्रश्नाच्या निमित्ताने माझा छात्रभारती या विद्यार्थी संघटनेशी आणि त्यानंतर राष्ट्र सेवा दल या सामाजिक संघटनेशी संबंध आला. त्या संघटनांमध्ये दर आठवड्याला शनिवारी अभ्यास मंडळ व्हायचे. त्यात तरुण तरुणी एकत्र येऊन वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर चर्चा करायचे. वार्षिक शिबिरांमध्ये व्याख्याने व्हायची आणि त्यात अनेक विषयांची मांडणी व्हायची. तिथे माझी समता मुल्याशी ओळख झाली. त्यात मग महात्मा फुले-सवित्रीबाई फुले यांचे काम, स्त्री-पुरुष समता, रूढी परंपरा आणि शोषणाची मुळे, या अनुषंगाने आपले दैनंदिन जगणे तपासणे, चांगल्या रुढी परंपरा स्वीकारणे आणि विषमतामूलक परंपरांना अधिक अर्थपूर्ण पर्याय देणे यांचा विचार करणे सुरु झाले. पुढे शोषणाला प्रोत्साहन देणाऱ्या, शोषणाची बिजे असणाऱ्या, विषमता मूल्ये पसरवणाऱ्या रूढी परंपरा नाकारणे सुरू झाले. सुरुवातीला या सर्व गोष्टींवर केवळ विचार म्हणून त्या अभ्यास मंडळांमध्ये चर्चा करायचो. ही मुल्ये महत्वाची आहेत आणि आपल्या आजूबाजूला हे चुकीचे आहे. त्यातून चुकीला चूक म्हणण्यापासून सुरुवात झाली. त्याचबरोबर जर चूक आहे तर ते नाकारायला हवं आणि नाकारताना चांगला पर्याय द्यायला हवा हे महात्मा फुले यांच्या सगळ्या एकूणच जीवन कार्यातून लक्षात आले. महात्मा फुलेंनी संपूर्ण आयुष्यात शोषण करणाऱ्या रूढी परंपरांवर आसूड ओढले, त्यांची कठोर चिकित्सा केली आणि त्याला समतामूलक पर्याय दिले. तोच मार्ग आम्ही स्वीकारला.
विचारांच्या पातळीवर असलेली ही मूल्ये हळूहळू व्यवहारात येत होती. मात्र ही मूल्ये जगण्याचा भाग झाला होतानाचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे आमचे लग्न. हे सहजीवन सुरू करताना त्याला एका विशिष्ट जातीच्या प्रतिनिधीची मान्यता घेऊन सुरुवात करणे म्हणजे जाती प्रथेला मान्य करणे आणि त्याला प्रोत्साहन देणे आहे असा आमचा विचार होता. म्हणूनच आम्ही पारंपरिक पद्धतीने लग्न करण्याऐवजी महात्मा फुलेंनी सांगितलेली सत्यशोधक विवाह पद्धत स्वीकारली.
हे लग्न करताना आम्ही त्यात काही अर्थपूर्ण गोष्टींचा समावेश देखील केला. आपल्याकडे लग्नात मुलीच्या कुटुंबाने कमीपणा घ्यावा, मुलाच्या कुटुंबाचा मानपान राखावा, लग्नाचा सर्व खर्च करावा अशी पद्धत आहे. त्यात नवरा मुलगा चांगल्या नोकरीला असेल तर हे मानपान आणि खर्च अधिकच वाढतात. यातून आर्थिक भार मुलीच्या कुटुंबावर टाकलाच जातो, मात्र केवळ मुलीचे नातेवाईक आहेत म्हणून त्यांना समानतेची, आदराची वागणूक मिळत नाही. त्यामुळे आम्ही पारंपरिक लग्न पद्धत नाकारली. तसेच लग्न हा दोन्ही कुटुंबाचा आनंद सोहळा असेल तर त्यात मुलगा आणि मुलगी दोन्ही बाजू सारख्या असतील, असं ठरवलं. या आनंद सोहळ्यात दोन्ही कुटुंबाच्या विविध नातलगांची एकमेकांशी ओळख होईल आणि साध्या पद्धतीने नवरा मुलगा आणि नवरी मुलगी आपल्या सहजीवनाला सुरुवात करतील. महत्त्वाचं म्हणजे मानपान आणि इतर देखाव्यांच्या गोष्टीचा अनावश्यक खर्च केला नाही.
लग्न सोहळा दोन्ही कुटुंबांचा असतो त्यामुळे दोन्ही कुटुंबांनी कोणताही मानपानाचा आग्रह न धरता एकत्रित यावं. छान पैकी स्नेहभोजन घ्यावं, दोन्ही कुटुंबाची एकमेकांशी ओळख व्हावी, सगळ्या थोरा-मोठ्यांच्या ओळखी व्हाव्यात, त्या आनंदाच्या क्षणाच्या काही आठवणी म्हणून छान फोटो काढावा आणि मस्त पैकी संगीत मैफील करावी असा विचार मांडत तो अमलात आणला. अशा प्रकारे आम्ही विचारपूर्वक सत्यशोधक लग्न केलं.
या लग्नातील एक सर्वात महत्वाचा भाग म्हणजे पारंपारिक लग्नातील विषमतामूलक गोष्टी नाकारणे. त्यातील एक गोष्ट होती मंगळसूत्र. मंगळसूत्र पुरुषाची मालकी दाखवणारा दागिणा आहे. तो आम्ही नाकारला. त्यामागे एक विचार होता. लग्नाच्या आधी मुलगी आपल्या अंगावर तिला हवा तो, छान दिसतो तो एखादा अलंकार घालते. मात्र ती तिची निवड असते. ती हवा तो अलंकार हवा तेव्हा घालते आणि हवा तेव्हा काढून ठेवतो. मात्र, लग्नानंतर मुलींना मंगळसूत्र हा दागिणा घालणं बंधनकारक केलं जातं. यामागे त्या मुलीचे लग्न झाले आहे हे इतरांना कळावं असा उद्देश असतो. मात्र, त्याचवेळी त्या मुलाचं लग्न झालं आहे हे सांगणारा कोणताही दागिणा मुलाच्या अंगावर नसतो. मंगळसूत्र घातलं की ती महिला तिच्या नवऱ्याची मालकी असते असाही एक अर्थ यातून काढला जातो. त्यामुळेच आम्ही मंगळसूत्र हे प्रतिक नाकारले.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या समाज व्यवस्थेने मुलीला केवळ खर्चाची गोष्ट करून ठेवलं. मुलं जबाबदारी घेतात, त्याउलट मुलींच्या बाबतीत जन्मापासून तर अगदी तिचं लग्न होऊन बाळांतपणापर्यंत मुलीला आई-वडिलांसाठी खर्चाची गोष्ट करून ठेवली आहे. त्यामुळे मग खर्चाची गोष्ट म्हणून मुलगी नको वाटते. ते तसं असू नये म्हणूनही आम्ही ठोस भूमिका घेतली. आई-वडील मुलीला लहानाचं मोठं करतात, शिक्षण देतात, तिला तिच्या पायावरती उभं करतात, मात्र, लग्नानंतर त्याच मुलीला आई-वडिलांची जबाबदारी घेता येत नाही. मात्र, दुसरीकडे मुलगा म्हणून ती जबाबदारी घेता येते. यातूनच मग व्यावहारिक विचार करत मुलगा फायद्याची गोष्ट झाली आणि मुलगी म्हणजे खर्चाची बाब झाली. त्यामुळे मुलगा हवासा आणि मुलगी नकोशी झाली. हे चित्र बदलवण्यासाठी मुलीलाही तिच्या जबाबदाऱ्या घेता यायला हव्यात. म्हणूनच आम्ही आमच्या लग्नात ही जाहीर भूमिका घेतली की, मुलगा म्हणून जसा मी माझ्या आईवडिलांची जबाबदारी घेतो, तशीच प्रियंकाही लग्नानंतर तिच्या भावाइतकीच तिच्या आई-वडिलांची जबाबदारी घेईल. पारंपारिक चौकटीत अनेक महिला लग्नानंतर माहेरी थोडीफार मदत करतात. मात्र, त्याला प्रतिष्ठा नसते. एखाद्या महिलेने माहेरी थोडीफार मदत केली, तर तिच्यावर टीका केली जाते, टोमणे मारले जातात की, स्वतःचा संसार सोडून माहेरी नेऊन घालते. म्हणजेच महिलेने लग्नानंतर आई-वडिलांना केलेली मदतही गुन्हा ठरते. म्हणूनच मुलींनाही त्यांच्या जन्मदात्या आई-वडिलांच्या जबाबदारीत सन्मानाने सहभागी होता आलं पाहिजे असा यामागे आमचा विचार होता.
मुलीलाही तिच्या आई वडिलांची जबाबदारी घ्यायची सोय असली पाहिजे. मुलीचं लग्न ही केवळ मुलीच्या आई वडिलांची जबाबदारी नसली पाहिजे, तर जे दोन व्यक्ती लग्न करत आहेत त्या दोन्ही कुटुंबांनी समप्रमाणात ही जबाबदारी उचलली पाहिजे. तसं झालं तरच मुलगी ओझं वाटून तिच्या जन्मालाच नकार देणं थांबेल.
म्हणूनच आम्ही स्त्री आहे म्हणून जेथे जेथे भेदभाव केला जातो, विषमतापूर्वक वागलं जातं त्या प्रथा नाकारल्या. त्याचाच भाग म्हणून लग्नाच्यावेळी आम्ही जाहीरपणे सर्वांना हे सांगितलं की, जसा मुलगा म्हणून मी माझ्या आई-वडिलांची जबाबदारी घेणार आहे, तशीच प्रियंकाही लग्नानंतर आधीप्रमाणेच तिच्या भावइतकी आई-वडिलांची जबाबदारी घेईल.
आम्ही आमच्या लग्नात कन्यादानही केले नाही. कारण दान करायला मुलगी म्हणजे काही वस्तू नाही. लग्नाआधी वडिलांची मालकी आणि लग्नानंतर नवऱ्याला दान करून ती नवऱ्याची मालकी वस्तू करण्याच्या विचाराला आमचा विरोध होता. आमच्या सहजीवनात आम्ही एकमेकांची ओळख पुसणे आणि एकमेकांचा अनादर करणे याला काहीही स्थान नसेल असे आम्ही स्पष्टपणे सांगितले.
सत्यशोधक पद्धतीने लग्न करताना कर्मकांड टाळणे, रुढी परंपरांमधील चांगला भाग स्वीकारणे आणि जो काही विषमतामुलक भाग होता तो काढणे असा हेतू होता. त्यामुळे जेथे विषमता, शोषण किंवा अर्थहीन कर्मकांड दिसले तेथे आम्ही अधिक अर्थपूर्ण पर्याय दिले. याचे एक उदाहरण म्हणजे, लग्न करताना आपल्याकडे नवरा आणि नवरीच्या पाठीमागे मामा उभे राहतात. आत्या मंडपाच्या प्रवेशद्वारावर स्वागत करत नवरा-नवरीला ओवाळते. यावरून मागे उभे राहिलेले मामा आणि ओवाळणारी आत्या आहे एवढीच माहिती कळते. त्यापलीकडे त्या व्यक्तींची विशेष ओळख होत नाही. या प्रतिकात्मक गोष्टीला आम्ही अधिक अर्थपूर्ण केलं. त्यासाठी आम्ही आमच्या नातेवाईकांची उपस्थितांना व्यवस्थित ओळख व्हावी म्हणून आमच्या जडणघडणीत महत्त्वाचं योगदान असलेल्या नातेवाईकांचा एक परिचय व्हिडीओ तयार केला. त्यासाठी आम्ही दोघांनीही लग्नापूर्वी आई-वडील, मामा-मामी, काका-मावशी, चुलते-चुलती, आत्या-मामा या सर्व नातेवाईकांच्या मुलाखती घेतल्या. तसेच लग्नाच्या दिवशी मोठ्या स्क्रिनवर या नातेवाईकांची ओळख करून देत त्यांचं आमचं आयुष्यातील योगदान अधोरेखित करत कृतज्ञता व्यक्त केली.
कारण आपण लहानाचे मोठी होत असताना प्रत्येकाचा हातभार लागलेला असतो. एखाद्याच्या योगदानाबद्दल, मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही फारच समृद्ध करणारी मानवी भावना आहे. त्यामुळे आम्ही ते सगळे केले. असं असलं तरी नातेवाईकांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचं पालन केलं नाही. त्यांनी जे काही सांगितलं त्याला तर्काची कसोटी लावली. ते जे सांगत होते त्यामागील त्यांची भूमिका आणि कारणं समजून घेतली. ज्या प्रथा, परंपरा, रुढींमागील कारणं पटली ती स्वीकारली आणि जी पटली नाही ती नाकारत त्याला अधिक अर्थपूर्ण पर्याय दिले.
लग्नाबाबतचे आणखी एक उदाहरण म्हणजे, सगळ्यांचे म्हणणे होते की लग्न हे मंगलाष्टकांशिवाय होत नाही. अशावेळी आम्ही महात्मा फुलेंनी आपल्या सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकात मांडलेली मंगलाष्टके निवडली. पारंपारिक लग्नात न कळणाऱ्या संस्कृत मंत्रोच्चाराचा वापर होतो. त्याचा कुणालाही अर्थ कळत नाही. त्याऐवजी महात्मा फुलेंनी लिहिलेली मंगलाष्टके मराठीत असल्याने ती सर्वांना कळतात. त्यात निसर्गापासून अनेक चांगल्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच त्याबद्दल कृतज्ञतेती भावना व्यक्त करण्यात आली आहे. सप्तपदीऐवजी आम्ही सहजीवन सुरू करताना जी काही मूल्य पाळणार आहोत, जी काही वचन एकमेकांना देणार आहे त्याची प्रतिज्ञा घेतली.
सत्यशोधक लग्न होण्याआधी अनेकांना हे काय आहे हे माहिती नव्हतं. त्यात काही नातेवाईकांनी सत्यशोधक लग्न असं युट्युबवर सर्च केलं. तेथे जे व्हिडीओ पाहिले त्यातून ही पद्धत आपल्या जातीची नाही म्हणत विरोध केला. तसेच हे करण्याऐवजी तू नोंदणी विवाह करून रिसेप्शन दे असाही पर्याय दिला. मात्र, त्यावर आम्ही सत्यशोधक लग्न हे आमच्या मुल्यांचं असल्याचं सांगत याच पद्धतीने लग्न करण्यावर ठाम राहिलो. त्यामुळे सुरुवातीला सर्वच नातेवाईक नाराज होते. मात्र, लग्न झालं त्या दिवशी अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच यातील विविध पर्यायांचे, साध्या पद्धतीचे, कमी खर्चिक गोष्टींचे कौतूक केले.
या सगळ्या प्रक्रियेला आम्हाला बराच वेळ द्यावा लागला. वेळोवेळी संघर्षही करावा लागला. हे करताना आपला विचार, भूमिका आणि मुल्ये नातेवाईकांपर्यंत पोहचायला हवीत हाही विचार होता. त्यासाठी आम्ही जवळच्या नातेवाईकांना प्रत्यक्ष भेटून याबाबत माहिती देण्याचं आणि त्यांना भूमिका समजाऊन सांगण्याचा निर्णय घेतला. यामुळे काही नातेवाईक ते मान्य करतील काही नातेवाईक मान्य करणार नाही असंही होईल. मात्र, या निमित्ताने आपली भूमिका सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे, त्यावर चर्चा झाली पाहिजे. नातेवाईक ऐकणारच नाही, त्यांना आपले विचार मान्यच होणार नाही असं म्हणून त्यांच्याशी संवादच साधला नाही, तर विचारांची देवाण घेवाणच होणार नाही, असा विचार करून आम्ही हा संवाद साधला.
या संवादाची सुरुवात एका नातलगापासून झाली. त्यांनी सुशिक्षित असूनही या विचारांना विरोध केला. इतकंच नाही, तर आम्ही इतर नातेवाईकांना भेटून आमची भूमिका समजून सांगण्याआधीच त्यांनी फोनद्वारे इतर नातेवाईकांना या विचाराच्या विरोधात केले. यामुळे आपले विचार, मुल्ये सकारात्मक पद्धतीने नातेवाईकांपर्यंत पोहचवण्याच्या आमच्या उद्देशाला धक्का लागला. मात्र, तरीही आम्ही सर्वांशी संवाद करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. नातेवाईकांनी असं काही होतं हे कधी डोळ्यांनी पाहिलं नव्हतं, अनुभवलं नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला स्वाभाविकपणे विरोध केला. मात्र, त्यांच्याशी संवाद साधत आम्ही आमच्या निर्णयावर ठाम राहिलो.
लग्न हा या मुल्यांच्या लढाईतील पहिला मोठा संघर्ष होता. मात्र, यानंतरही अनेक टप्पे येणार आहेत याची आम्हाला कल्पना होती. त्यातील पुढील टप्पा मुलांच्या जन्मानंतरच्या कर्मकांडाचा आणि पारंपारिक भूमिकांचा होता. मुलाला ९ महिने पोटात वाढवणे आणि जन्म देण्याची जबाबदारी निसर्गाने महिलेला दिली आहे. याशिवाय ६ महिने अंगावरचे दूध पाजणे आणि बालसंगोपन करण्याचीही जबाबदारी आईवरच आहे. यात पुरुषांचा थेट सहभाग नसतो. त्यामुळे बाळ ६ महिन्यांचे झाल्यावर त्याचं आईवरील अवलंबत्व कमी कमी होतं आणि ते बाहेरील अन्नपदार्थ खाऊ लागतं. त्या टप्प्यावर बाप म्हणून पुरुषही आपली भूमिका निभाऊ शकतो. असं असूनही बहुतांशी ही जबाबदारी पुन्हा महिलांवरच पडते. आम्ही मात्र ही पालकत्वाची जबाबदारी आईप्रमाणेच वडिलांचीही असल्याची भूमिका घेत निर्णय घेतला.
महिलांच्या आयुष्यातील दोन टप्प्यांवर त्यांचे करियर संपण्याचा धोका असतो. एक तर लग्नानंतर तिला तिची नोकरी सोडून पती जिथे नोकरी करतो तेथे जावं लागतं. तसेच घरच्या सर्व जबाबदाऱ्या एकटीने पूर्ण कराव्या लागतात. लग्नानंतरही ही नोकरी टिकली तर, बाळाच्या जन्मानंतर तुला बाळ महत्त्वाचं आहे की, नोकरी असा प्रश्न विचारून महिलांना नोकरी सोडण्यास भाग पाडलं जातं.हा प्रसंग फार भावनिक असतो. आईलाही आपल्या बाळाचे हाल होऊ नये, असे वाटत असते. त्यामुळे मग ज्यावेळी तिला नातेवाईक किंवा समाज नोकरी महत्वाची की तुझं बाळ महत्वाचं असा प्रश्न विचारतो तेव्हा तीही भावनिक होते. कारण तिच्यावरही बाळ आईचीच जबाबदारी आहे हे संस्कार झालेले असतात. त्यामुळे ती नोकरी सोडते. आमच्याबाबत आम्ही लग्नानंतर प्रियंकाच्या करियरवर परिणाम होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली होती. आता बाळाच्या टप्प्यावरही आम्ही विचारपूर्वक पाऊलं उचलली.
आम्ही सर्वात आधी आपल्याला बाळ हवं की नको यावरच चर्चा केली. जेव्हा बाळ हवं असा आम्ही दोघांनी निर्णय घेतला त्याचवेळी बाळाच्या जन्मानंतर बाळाची जबाबदारी एकट्या आईची नसेल, तर ती आम्हा दोघांची जबाबदारी असेल असंही ठरवलं. कारण केवळ एकट्यावर ही जबाबदारी पडली तर त्याचा आनंद न वाटता ते ओझं वाटतं आणि त्रासच होतो. त्यामुळे बाळाची जबाबदारी दोघांनी घेत दोघांनीही जबाबदारी आणि आनंद यात भागीदार होण्याचा निर्णय घेतला. यात माझी जोडीदार प्रियंकाच्या करियरवर परिणाम होऊ नये हा विचार तर होताच, पण बाप म्हणून मी माझी जबाबदारी उचलणं आणि माणूस म्हणून समृद्ध होणं हाही विचार होता. मलाही बाळाच्या संगोपनात येणारे चढ-उतार अनुभवायचे होते. त्यातून आम्ही त्या निर्णयापर्यंत आलो आणि तो नातेवाईकांना कळवला. यानंतर स्वाभाविकपणे घरच्यांसाठी हा निर्णय मोठा होता. ते या निर्णयावर नाराज होते. मात्र, त्यात काही सकारात्मक प्रतिसादही आले. माझ्या एका शिक्षक मामांनी मला फोन कॉल करून आधी निर्णय पटला नव्हता, पण एका मानसशास्त्र अभ्यासकांबरोबर बोलल्यावर तुझा निर्णय पटला, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच काहीही मदत लागली तर सांगण्याचा वडिलकीचा सल्लाही दिला.
प्रियंका आणि मी प्रत्येक गोष्टीवर चर्चा करुनच निर्णय घेतो. आपला ज्या मुल्यांवर विश्वास आहे आणि जी मुल्ये समाजाला अधिक उन्नत स्थितीत नेऊ शकतात ती मुल्ये आपल्या जगण्यात उतरली पाहिजे हा आमचा आग्रह आहे. जर आपण आपली मुल्ये स्वतःच्या जगण्यात आणू शकलो नाही, तर ते आपलं सर्वात मोठं अपयश असेल, अशी आमची भूमिका होती. म्हणूनच आम्ही ही मुल्ये जगू शकलो.
आता बाळ ६ महिन्यांचे झाल्यावर प्रियंकाने तिची नोकरी पुन्हा सुरू केली आहे आणि मी बाळाच्या संगोपनाची जबाबदारी उचलत आहे. प्रियंका आधीपासून घरातील काम आणि नोकरी अशा दोन्ही पातळ्यांवर काम करत होती. मात्र, पुरुष प्रधान संस्कृतीमुळे माझ्याकडे केवळ नोकरीतील कौशल्ये आहेत. त्यामुळे बाळाचा सांभाळ आणि घरातील कामांची अनेक कौशल्ये माझ्यात नाहीत. त्यामुळे सध्या तरी बाळाचं संगोपन आणि घरातील काम असं मल्टिटास्किंग करताना माझी धांदल उडते आहे, गोंधळ उडतो आहे. मी प्रियंकाच्या मदतीने ही जीवनावश्यक कौशल्ये शिकतो आहे. वेळ देऊन काम केलं की, काही दिवसांनी मीही ही सर्व कामं प्रियंकाप्रमाणे करू शकेन.
आम्ही जे वाचन केलं, बालविकास आणि संगोपनातील तज्ज्ञांशी बोललो त्यातून बाळाचे सुरुवातीचे १ हजार दिवस अत्यंत महत्वाचे असतात हे समजलं. म्हणजेच बाळ २ वर्षांचे होईपर्यंत बाळाच्या मेंदुचा जवळपास ७० टक्के विकास होतो. म्हणूनच बाळ दोन वर्षांचे होईपर्यंत त्याच्यासोबत त्याच्या आई-वडिलांपैकी एक जण पूर्णवेळ असणे गरजेचे वाटले. एकदा की बाळ दोन वर्षाचं झालं की त्याच्याशी आपल्याला बोलता येतं. आता आई आणि बाबा कामावर जाणार आहेत. त्यामुळे थोडा वेळ तुला पाळणाघरात इतर मित्रांसोबत राहावे लागेल, असं सांगता येईल. तो तिथे इतर मुलांसोबत खेळेल, इतर मुलांशी त्याची मैत्री होईल आणि मग उर्वरित वेळेत आम्ही दोघे त्याच्यासोबत असू.
याप्रमाणे मी दोन वर्षापर्यंत बाळाबरोबर पूर्ण वेळ असेल आणि एकदा बाळ दोन वर्षाचं झालं, त्याच्या मनाची एकदा तयारी झाली की, त्याच्याशी संवाद करू. बाबा आणि आई कामावर जाणार आहेत. संध्याकाळी आई बाबा परत येणार आहेत, असा बाळाला विश्वास देता येईल आणि त्यालाही ते समजून घेता येईल. या टप्प्यावर बाळाच्या संगोपनासाठी पाळणाघराची मदत घेऊन मीही माझी नोकरी आम्ही पुन्हा सुरू करेन.