Dengue In Diabetic Patients : डेंग्यू सारख्या गंभीर आजाराला आळा घालण्यासाठी सर्व प्रकराची काळजी घेवूनही अनेकवेळा हा आजार पसरतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी रुग्णांची संख्या कितीतरी पटीने जास्त आहे. भारतातील काही शहरांमध्ये डेंग्यूचा धोका वाढत आहे आणि या शहरांमध्ये राहणाऱ्या सर्व वयोगटातील लोकांना धोका आहे. परंतु काही विशिष्ट वर्गातील लोक आहेत ज्यांना डेंग्यूचा धोका जास्त आहे. विशेषत: यामध्ये वृद्ध रुग्ण आणि काही जुनाट आजार असलेल्या रुग्णांचा समावेश होतो. विशेषत: मधुमेही रुग्णांमध्ये डेंग्यूचा धोका झपाट्याने वाढत असून यामागे पाच प्रमुख कारणे आज आपण जाणून घेणार आहोत. (5 Reasons Why Dengue is More Dangerous for Diabetes Patients)
कमकुवत रोगप्रतिकार प्रणाली
मधुमेहाच्या रुग्णांना रोगप्रतिकारक शक्तीची सर्वाधिक समस्या असते आणि त्यामुळेच कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे अनेक प्रकारच्या संसर्गाचा धोका वाढतो. डेंग्यू हा देखील एक प्रकारचा संसर्ग आहे, जो डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. त्यामुळे ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे त्यांना डेंग्यू होण्याचा आणि त्यातून गंभीर आजार होण्याचा धोका जास्त असतो.
कमकुवत रक्तवाहिन्या
रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये फॅट जमा होण्यास सुरुवात होते. हळूहळू या साठ्यामुळे रक्तवाहिन्या कडक होऊ लागतात आणि त्यामुळे रक्तवाहिन्या कमकुवत होतात. रक्तवाहिन्या कमकुवत झाल्यामुळे डेंग्यूसारख्या आजाराचा धोकाही वाढू शकतो.
विशेष आहार न घेणे
मधुमेही रुग्णांना त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते आणि त्यामुळे अनेक आरोग्यदायी गोष्टी आहेत ज्या मधुमेही रुग्ण खाऊ शकत नाहीत. योग्य आहार न घेतल्याने आपले शरीर कमकुवत होऊ लागते, त्यामुळे डेंग्यूसारख्या गंभीर आजाराचा धोका वाढतो.
शारीरिक हालचालींचा अभाव
मधुमेही रुग्णांना अनेकदा अशक्तपणा आणि थकवा यासारख्या समस्या येतात आणि त्यामुळे ते अनेकदा शारीरिकदृष्ट्या पुरेसे सक्रिय राहू शकत नाहीत. शारीरिकरित्या सक्रिय नसल्यामुळे तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवरच परिणाम होत नाही तर डासांच्या संपर्कात येण्याचा धोकाही वाढू शकतो. मधुमेही रुग्णांमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढण्यामागे हे देखील एक कारण असू शकते.
डासांचा जास्त संपर्क
डासांच्या संपर्कात कोणीही येऊ शकतो आणि त्याचा कोणत्याही आजाराशी संबंध नाही. मधुमेहाचे रुग्ण नेहमीपेक्षा जास्त डासांच्या संपर्कात येण्यामागे काही कारणे असू शकतात. यापैकी एक कारण म्हणजे मधुमेहाच्या रुग्णांना अनेकदा सकाळी आणि संध्याकाळी चालण्याचा सल्ला दिला जातो. त्याचबरोबर उद्यानांसारख्या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ डासांची संख्या वाढते आणि अशा ठकाणी जेव्हा हे रूग्ण फिरायला जातात तेव्हा डासांच्या संपर्कात येतात.