Bail Pola Puran Poli Health Benefits : महाराष्ट्रात पुरण पोळीला खूप महत्व आहे. पुरण पोळी हा महाराष्ट्राचा पारंपारिक पदार्थ आहे कारण प्रत्येक मोठ्या सणाला पुरणपोळी प्रत्येक घरात केली जाते. गुढीपाडवा, पोळा, दिवाळी, दसरा अशा मोठ्या सणाला पुरणपोळी केली जाते. महाराष्ट्रात आज बैल पोळा साजरा केला जातो. बैल पोळा हा श्रावण मासाच्या पिठोरी अमावस्येला येतो. या दिवशी शेतकरी त्यांच्या बैलांची पूजा करतात आणि त्यांना पुरणपोळी तुपाचा नैवद्य लावला जातो.
हा सण महाराष्ट्रात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो आणि म्हणून या बैल पोळ्याला मराठी सण म्हणूनही संबोधले जाते. या दिवशी बैलांना गावच्या मारूतीच्या मंदिरात घेऊन जातात आणि त्यानंतर घरी आणले जाते. ओवाळल्यानंतर बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. म्हणून आज आपण पुरणपोळी कशी तयार करायची आणि त्याचे आरोग्यदायी काय फायदे आहे ते जाणून घेणार आहोत.
पुरणपोळी- हेल्दी की अनहेल्दी? (Puranpoli – Healthy or Unhealthy?)
पुरण पोळीला तमिळमध्ये परुप्पू पोली, कन्नडमध्ये होलिगे किंवा ओब्बट्टू, कोकणीमध्ये उब्बती अशी विविध प्रादेशिक नावे आहेत. प्रदेशानुसार या पदार्थाची चव आणि ती तयार करण्याची पद्धत देखील बदलते. हा गोड पदार्थ पोळीसारखा असतो आणि प्रत्येक सणाला महाराष्ट्रातील घरोघरी केला जातो, म्हणून आज आपण वैदर्भीयन पद्धतीची पुरणपोळी करण्याची रेसिपी जाणून घेणार आहोत.
प्रत्येक पदार्थाचे फायदे आणि तोटे असतात. तेव्हा कोणताही पदार्थ खाताना आपण सयंमाने खाणे महत्वाचे आहे. पुरणपोळी हा हाय कॅलरी पदार्थ आहे. तेव्हा हा पदार्थ आरोग्यदायी बनवणे हे आपल्यावर अवलंबून असते. म्हणून पुरणपोळी करताना मैद्याऐवजी संपूर्ण गव्हाचे बारीक पीठ वापरा, वनस्पती तुपाएवजी साजूक तुपाचा वापर करा.
वैदर्भीयन पुरणपोळी रेसिपी (Vaidrabhiyan Puranpoli Recipe)
साहित्य : 2 वाटी चण्याची डाळ, 4 वाटी पाणी, 2 1/2 वाटी साखर, 1 चमचा वेलची पूड, 1/2 चमचा जायफळ पूड
कृति: सर्वप्रथम चण्याची डाळ पाण्याने धुऊन घ्यावी. नंतर कुकरमध्ये धुतलेली डाळ टाकून त्यात 4 वाटी पाणी घालून कुकर गॅसवर ठेवावा. 4-5 कूकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर गॅस थोडा मंद करून एक शिट्टी होऊ द्या. त्यानंतर कुकरमधील मऊ शिजलेली डाळ एका भांड्यात काढून घ्या. त्यानंतर हे भांडे गॅसवर मंद आचेवर ठेवा. त्यात 2 वाटी साखर घालून डाळ आणि साखर एकजीव करा. साखर विरघळेपर्यंत गॅस मंद आचेवर ठेवा.
हळूहळू साखरेचा पाक पातेल्याच्या कडेने दिसू लागेल आणि मिश्रण थोडं घट्ट होईल त्यानंतर त्यात वेलची आणि जायफळची पूड घाला. चवीनुसार तुम्ही मीठ ही घालू शकता. मिश्रण गरम असतानाच पुरण यंत्रातून काढून घ्यावे. लक्षात ठेवा हे मिश्रण थंड झाल्यावर पुरण यंत्रात बारीक करताना अडचण येऊ शकते. बारीक केलेले मिश्रण थोडा वेळ थंड होण्याकरिता ठेवावे. पोळी करण्यारीता एक वाटी कणीक मळून घ्यावी. मिश्रण थंड झाल्यानंतर पुरण पोळी करायला घ्या. त्यासाठी कणकेचे छोटे गोळे करून घ्या. गोळ्याची छान पुरी लाटून घ्या. त्यात पुरणाचे मिश्रण घालून पोळी अलगद पोळपाटावर लाटून घ्या. इकडे तव्यावर थोडे तूप घालून त्यावर पोळी टाका. पोळीच्या कडेने हळूहळू तूप घाला. पोळी एका बाजूने सोनेरी पिवळसर रंग आला की परतून घ्या. दोन्ही बाजूने पोळी छान शिजवून घ्या. तुमची खमंग अशी पुरणपोळी तयार.
पुरणपोळी खाण्याचे फायदे (Benefits of eating Puranpoli)
संपूर्ण गव्हाच्या पीठाने बनवलेल्या पुरण पोळीमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, फायबर, बी कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे, विशिष्ट खनिजे असतात. जसे की आपण सर्व जाणतो की हरभऱ्याच्या डाळीमध्ये मोठ्यो प्रमाणात प्रथिने असतात. फायबरयुक्त गव्हाचे पीठ आणि डाळीतील प्रथिने यांचे हे मिश्रण तुम्हाला चांगल्या दर्जाचे प्रोटीन पोषण देवू शकते. पुरणपोळी जवळजवळ 100% जैवउपलब्धता म्हणजेच उत्कृष्ट गुणवत्तेसह उच्च जैविक मूल्य मानले जाते. हे मिश्रण सर्व आवश्यक अमीनो ऍसिड देते जे प्रथिनांचे बिल्डिंग ब्लॉक्स असतात.
पुरणपोळीमध्ये भरपूर साखरेएवजी भरपूर गुळ घातला तर त्यातून लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस हे घटक मिळतात जे साखरेपेक्षा हळू पचत असल्याने हळूहळू शरिराला ऊर्जा देतात. गूळ पचनास देखील मदत करतो. पुरणपोळीमध्ये वपरली जाणारी हिरवी वेलची पावडर, केशर, जायफळ पावडर ज्यामध्ये आवश्यक घटक असतात जे पचनशक्ती वाढवते आणि हे सुगंधी पावडर अँटीस्पास्मोडिक, कार्मिनेटिव, दाहक-विरोधी आणि सूक्ष्मजीवविरोधी आहेत. म्हणून पुरणपोळी खाताना बिनधास्त खा पण आपल्या आरोग्याचीही काळजी घ्या.