What Is Mumps : : राजस्थानमध्ये एक धोकादायक संसर्गजन्य रोग वेगाने पसरत आहे. गालफुगी (मम्प्स) असे या आजाराचे नाव सांगितले जाते. अहवालानुसार, या विषाणूची लागण झाल्यानंतर आतापर्यंत 6 लोक कायमचे बहिरेपणाचे बळी ठरले आहेत. यामध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. यापूर्वी वर्षभरात गालफुगीची 5 ते 7 प्रकरणे दिसून येत होती. आता दर महिन्याला 50 हून अधिक प्रकरणे समोर येत आहेत. वैद्यकीय आणि आरोग्य विभागाने लहान मुले आणि प्रौढांमधील गालफुगी टाळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
या आजाराबद्दल अधिक माहीत बालरोगतज्ञ डॉ. सचिन पावडे यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे.गालफुगी या संसर्गजन्य आजाराबद्दल माहिती देताना डॉ. पावडे सांगतात की, ‘हा आजार सहसा शाळकरी मुलांमध्ये आढळून येणार आजार आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने घरच्या इतर लहान मोठ्या सदस्यांना देखील होऊ शकतो. हा स्वत: बरा होणारा आजार आहे. पण सुरवातीला या आजारामध्ये ताप आणि वेदना असतात.’ या आजाराला खूप घाबरण्याची गरज नसली तरी आपण या आजारपणात कशी काळजी घ्यावी हे त्यांनी सांगितले आहे.
गालफुगी म्हणजे काय?
गालफुगी हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे जो प्रामुख्याने लाळ ग्रंथींना प्रभावित करतो. या विषाणूमुळे चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंच्या ग्रंथींना सूज येते. ज्याला गालगुंड असे म्हणतात. हा आजार सामान्यतः लहान मुलांमध्ये होतो, परंतु आता प्रौढ देखील त्याला बळी पडत आहेत. हा संसर्ग शिंका, नाक आणि घशातून येणा-या संसर्गजन्य थेंबांच्या संपर्कातून पसरतो.
गालफुगीची लक्षणे (Symptoms of mumps)
गालफुगीची लक्षणे संसर्ग झाल्यानंतर 1-2 आठवड्यांच्या आत दिसतात. त्याची लक्षणे फ्लूसारखी असतात. गालफुगीच्या काही सामान्य लक्षणांबद्दल जाणून घेऊया.
गाल किंवा जबडा सूजणे
चेहरा, जबडा आणि कानाजवळ वेदना
मान सूजणे
डोकेदुखी
थकवा आणि अशक्तपणा
स्नायू दुखणे
सौम्य ताप
भूक न लागणे
अशक्तपणा
तोंड कोरणे पडणे
सांधे दुखी
गालफुगी कशी टाळायची? (How to prevent mumps?)
हा आजारा ज्या मुलांना झाला त्यांना बाहेर किंवा शाळेत पाठवू नका.
ताप असेल किंवा डोकं दुखत असेल तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क करा.
भरपूर पाणी प्या कारण या आजारामध्ये भूक मंदावते, त्यामुळे तुम्ही ORS पाणी देखील लहान मुलांना देऊ शकता.
गालगुंड रोग टाळण्यासाठी, मुलांना MMR लस देणे आवश्यक आहे.
तुमच्या घरात गालफुगी झालेली पेशंट असेल तर वारंवार हात धुवा त्याच्यापासून लांब रहा किंवा मास्कचा वापर करा.
घरातील एखाद्याला गालफुगीची समस्या असल्यास, त्याला किमान 7 दिवस वेगळे ठेवा.
शक्य तितके मऊ पदार्थ आणि जास्त द्रव पदार्थ खायला द्या.
सूज कमी करण्यासाठी बर्फाचा पॅक वापरा.
गालफुगीची लक्षणे दिसू लागताच ताबडतोब डॉक्टरांकडे जा आणि योग्य उपचार करा.