Women’s Marriage Life : लग्न आणि रूढींच्या नावाखाली महिलांवरच बंधने लादल्याचे अनेकदा दिसून येते. विवाहित असल्याचा पुरावाही केवळ महिलांकडूनच मागितला जातो. सण-उत्सव साजरे करणे ही महिलांची जबाबदारी असून केवळ महिलांनाच उपवास करावा लागतो. माझं लग्न झालं हे महिलांनाच का दाखवावं लागतं? अलीकडेच, मध्य प्रदेशातील इंदूर येथील कौटुंबिक न्यायालयाने म्हटले आहे की, ‘भांगात कुंकू भरणे’ हे विवाहित हिंदू महिलेचे धार्मिक कर्तव्य आहे कारण यामुळे ती विविहित आहे की नाही हे सिद्ध होते. इंदूर कौटुंबिक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एनपी सिंह यांनी 1 मार्च रोजी दिलेल्या आदेशात एका महिलेला तिच्या पतीच्या घरी त्वरित परत जाण्याचे निर्देश दिले होते. (According to womens opinion important for a married woman to look married to be safe in society)

पत्नीने पती जेवल्यानंतरच जेवायला हवे, तिने आपला पदर नेहमी डोक्यावर ठेवावा, कितीही अस्वस्थ वाटत असले तरी नवविवाहित वधूने शृंगार केला पाहिजे आणि अलंकार घातले पाहिजे असे चित्र आजही ग्रामीण असो वा शहरी भागात बघायला मिळते. सामान्यतः स्त्रिया तेव्हाच आदर्श मानल्या जातात जेव्हा त्या अशा प्रथा पाळतात. पण विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे विवाहित स्त्रीने विवाहित दिसणे का महत्त्वाचे आहे? त्याच वेळी, अशा कोणत्याही परंपरा किंवा प्रथा पुरुषांसाठी का तयार करण्यात आल्या नाहीत? असे प्रश्न ज्या महिलांना पडतात त्यांना या समाजाकडून ‘अतिशहाणी’ ही पदवी दिली जाते.
स्त्रियांच्या इच्छेविरुद्ध खेळणारी पितृसत्ता

काही स्त्रिया लग्नानंतर भांगात कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या, पायात जोडवी घालतात. काही स्त्रिया आहेत ज्यांना हे सर्व घालणे आवडत नाही. काय घालावे, काय घालू नये ही पूर्णपणे वैयक्तिक निवड आहे. या सर्व गोष्टींशी समाजाचा संबंध नसला तरी या रूढींच्या विरोधात जाऊन आपल्या वैयक्तिक इच्छांना प्राथमिक मानणाऱ्या स्त्रियांच्या चारित्र्याची सहज हत्या केली जाते. ज्या महिला आवडीने हे सर्व करतात किंवा नटतात त्यांचा आदरच आहे पण ज्या महिलांना हा सर्व दिखावा करायला आवडत नाही त्यांच्यावर ही बंधन लादू नये. मंगळसूत्र, जोडवी, बांगड्या हे सर्व बायकांचे पतीवरचे प्रेम असते, जे समर्पणाच्या रूपाने व्यक्त होते. पण जेव्हा लग्न दोन व्यक्तींमध्ये होते तेव्हा समर्पण फक्त एकतर्फी का? असाही प्रश्न निर्माण होतो.
अदृश्य बेड्या, बॉलिवूड आणि टेलिव्हिजन मालिका

विवाहित स्त्रीयांसाठी मंगळसूत्र, जोडवी, बांगड्या, भांगात कुंकू असणे आवश्यक आहे कारण जोडीदाराचे आयुष्य आणि त्याचे प्रेम या सर्व चालीरितीसोबत जोडलेले आहे. हे सर्व धार्मिकतेपेक्षा भावनिक आणि जबाबदारीचे आहे असे अनेक महिलांना वाटते. आणि हीच विचारधारा तयार करण्यात बॉलिवूड आणि टेलिव्हिजन सिरियलनेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भांगात भरलेलं कुंकू आणि मंगळसूत्राचे महत्त्व आणि त्याची शक्ती किती महान आहे हे शतकानुशतके बॉलीवूड दाखवत आले आहे. ज्याचा थेट संबध पतीच्या आयुष्याशीही जोडण्यात आला आहे. तुम्ही बुलबूल किंवा देवदास चित्रपट बघा, मराठी असो वा हिंदी मालिका बघा त्यामध्ये तुम्हाला खरी परिस्थीती काय आहे हे बघायला मिळेल. कधी सौंदर्य, कधी आवड,कधी धार्मिक, कधी वैज्ञानिक कारणं तर कधी कर्तव्य म्हणत स्त्रियांच्या अंगावर किती सहज हे दागिणे घातले गेले हे तिलाही कळल नाही.
माझ्या लहानपणी माझ्या आजीने 1 किलो डाळ आणि गव्हाच्या बदल्यात माझे नाक आणि कान टोचले होते. आजही लग्नाच्या आधी मुलीचे नाक टोचले आहे का हे बघितले जाते, नसेल तर तिला डॉक्टर किंवा सोनाराकडे जावून टोचून घे असा सल्लाही दिला जातो.
परंपरांच्या नावाखाली महिलांची फसवणूक होतेय का?

तुम्ही अनेकदा ऐकले असेल की भरपूर दागिणे घालून आणि कुंकू लावलेली महिला दिसली की तिच्या सौदर्याचं भरभरून कौतूक केलं जात. पण सौंदर्य पाहणाऱ्याच्या डोळ्यात असते त्याला अलंकाराची गरज पडत नाही या म्हणीचा अर्थ आजही अनेकांना उमजला नाही. सौंदर्याचे कारण पुढे करत स्त्रियांवर रूढीवादी परंपरा लादल्या गेल्या आहेत. पण अनेक महिलांना लग्नानंतर आत्मसंरक्षणासाठी विवाहित दिसणे महत्वाचे वाटते. मी एका विवाहित महिलेला विचारले की ती मंगळसुत्र का घालते पायात जोडवी का घालते तर तिचे उत्तर होते की,
ती तिच्या आनंदासाठी, सुंदर दिसण्यासाठी आणि तिला आवडते म्हणून या सर्व गोष्टी फॉलो करते. यातुन मला माझ लग्न झालं आणि मी किती सुंदर दिसते,लग्नानंतर सौंदर्यात पडणारी भर आणि त्यातून निर्माण होणारा आत्मविश्वास खूप मोठा असतो. मला सुंदर दियासला आवडतं आणि या अलंकारांमुळे माझ्या सौंदर्यात भर पडते म्हणून मला ते घालायला आवडतात यात मला कोणताही दबाव वाटत नाही.
‘समाजात मला प्रोटेक्टिव फिल होते’
विवाहित महिलेसाठी कुंकू आणि मंगळसूत्र का आवश्यक आहे सांगताना पेशाने शिक्षिका असलेली माझी मैत्रिण म्हणाली की,
माझ्या नवऱ्याचं किती प्रेम आहे हे मला अलंकारातून दाखवण्याची गरज नाही. पण मला आवडत माझं लग्न झालंय याचा मला आनंद आहे आणि मी माझ्या नवऱ्यासोबत सुखी आयुष्य जगत आहे तर मला हे सर्व आवडीने करायला आवडत. माझ्या नवऱ्याने माझ्यावर कधीही कोणतेही बंधन घातली नाही. उलट मला ज्या ड्रेस वर ज्याप्रकारचे मंगळसूत्र घालायाला आवडते ते मी घालते आणि त्यामुळे माझं सौंदर्य अधिक खुलून दिसत असेल तर ते माझ्या नवऱ्यालाही आवडते.यामुळे माझा आत्मविश्वास वाढतो. यामुळे समाजात मला प्रोटेक्टिव फिल होते, मला दोन मुलं आहेत पण आजही आमच्यामधलं प्रेम विश्वास आणि एकमेकांच्या चांगल्या विचारांमुळे कायम आहे म्हणून मला तरी परंपरांच्या नावाखाली माझी फसवणूक होतेय किंवा माझ्यावर कुठले बंधन आहेत असं मला वाटत नाही.

प्रेमावर आणि निष्ठेवर शंका घेणे हे कोणतीही स्त्री मान्य करणार नाही
महिलांना त्यांच्या दागिन्यांमुळे कमी लेखण्याची परंपरा जुनी झाली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणी काय आणि केव्हा घालायचे हेही महिलांना आता समजायला लागले आहे. हा त्या महिलेचा वैयक्तिक विचार आणि निर्णय असतो. मंगळसूत्र घालून नवऱ्याप्रती प्रेम व्यक्त करायचे असेल तर नक्कीच केले पाहिजे. पण ज्या स्त्रियांना हे सर्व करणे आवडत नाही अशा स्त्रियांच्या चारित्र्यावर शंका घेणे किंवा त्यांच्या आयुष्यातील या छोट्याशा गोष्टीबद्दल तिच्या प्रेमावर आणि निष्ठेवर शंका घेणे हे कोणतीही स्त्री मान्य करणार नाही. अनेक स्त्रिया म्हणतात की पुरुषांना कोणत्याही गोष्टीचे बंधन नसते. त्यांना वाटेल तसे ते करतात किंवा जगतात. जेव्हा मी एका सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या मैत्रिणीला विचारले तेव्हा तिने सांगितले की,
पुरुषांबद्दल नाही पण एक महिला म्हणून मी याकडे कसे पाहते हे मला जास्त महत्वाचे वाटते. बाहेर काम करत असताना महिलांकडे लोकं कोणत्या नजरेने बघतात हे गळ्यातील मंगळसुत्रावरून ठरते. तुम्ही समाजात वावरत असताना कोणत्याही पुरुषाची नजर आधी महिलांच्या गळ्याकडे आणि नंतर पायाकडे जाते. जर ती जास्त वयाची कुमारी असेल तर तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि जर ती विवाहित असेल तर तिच्यापासून कोणताही पुरूष चार हात लांब राहतो. त्यामुळे मी स्वत:च्या आधारासाठी, आत्मसंरक्षणासाठी, समाजाच्या घाणेरड्या नजरेला सामोरे जाण्यासाठी महिलांनी या सर्व गोष्टी घातल्या पाहिजे असेच सांगेन.
महिलांनी विवाहित दिसणे का महत्त्वाचे आहे?
अनेक स्त्रिया लग्नानंतर विवाहित दिसणे आवश्यक मानत नाहीत. काही स्त्रिया अशा आहेत ज्या आपला पती हयात नसतानाही सिंदूर लावतात. बॉलिवूड अभिनेत्री रेखा हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. यामागे आजही महिला सुरक्षित नाही असाच अर्थ निघतो. आता रेखा मोठी सेलिब्रिटी असल्याने तिने काहीही केले तरी तिला कुणी बोलायला जाणार नाही. पण जेव्हा एक विधवा महिला गळ्यात मंगळसुत्र घालते किंवा भांगात कुंकू भरते तेव्हा ती असं का करते यामागे संवेदनशील कारण असू शकते. आजही एकटी महिला आपल्या समाजात सुरक्षित नाही. म्हणून मी कुणाच्या तरी मालकीची आहे किंवा माझ्यावर कुणाचा तरी हक्क आहे, मि निराधार नाही असे दाखवण्यासाठी समाजातल्या घाणेरड्या नजरा फेस करण्यासाठी महिला एक सुरक्षा कवच म्हणून मंगळसुत्र घालतात कुंकू लावतात हे सत्य आपल्याला नाकारता येणार नाही.

महिला ग्रामिण भागात असल्या तरी आवडीनुसार फॅशन करतात
मुळात विवाहित दिसणे किंवा न दिसणे हा प्रश्न आता उरलेला नाही. अनेक महिला कार्पोरेट कपन्यांमध्ये काम करतात. काही महिला ग्रामिण भागात असल्या तरी आवडीनुसार फॅशन करतात. तेव्हा त्यांना जे आवडतं जस आवडत तसं त्या नटतात. कुणाला नटायची आवड असते म्हणून त्या अलंकार घालतात तर कुणाची राहणी साधी असते म्हणून त्या फक्त शोभेची वस्तू किंवा आपल्या फॅशनला टच म्हणून मंगळसुत्र घालत असतात. एवढ सगळ असूनही कुंकू लावल्याने, मंगळसुत्र आणि पायात जोडवी घातल्याने महिलांचे आरोग्य कसे चांगले राहते हे सांगितले जाते. लग्नानंतर संस्कृती, परंपरा जपत असताना महिलाना आजही वैज्ञानिक दाखले दिले जाते. बाहेरचे देश कशी आपली संस्कृती फॉलो करते आपण का आपले संस्कार विसरावे हे सांगत असताना पुरुष मात्र धोतर-पयजामा घालणे विसरत चालला आहे हे कुणाच्या लक्षात येणार नाही.

न सांगता येणारा तो दबाव ती आनंदाने स्विकारते
लग्नानंतर मुलीला ती गोष्ट आवडते का किंवा तिची या सर्व गोष्टी करण्यासाठी सहमती आहे का असे प्रश्न तिला कधी विचारले जात नाही. न सांगता येणारा तो दबाव ती आनंदाने स्विकारते. तिला स्वातंत्र देत असताना त्यामध्ये आजही अनेक फिल्टर लावले जाते आणि संस्काराचे दाखले दिले जाते. महिलांनी जिन्स घालावी पण त्यावरचा टॉप किती लांब असावा, तिने नोकरी करावी पण घरं सांभाळणे देखील किती महत्वाचे आहे, नोकरीवरून ट्रान्सफर झाली तर नवऱ्याच्या मागे जावं पण बोयकोच्या ट्रान्सफरसाठी किती नवरे तिच्या मागे जाते यावर विचार करण्याची गरज वाटत नाही का?