काळ्या वावरात बईलाचा घाम जिरे । गच्च भरलंय रान कणसाचे तुरे ॥
Bail Pola Special : भारताच्या कृषीप्रधान ओळखीचा एक महत्वाचा भाग म्हणजे बैल. अधुनिक काळात ट्रॅक्टर आणि तत्सम साधनांमुळे शेतीची कामे सोपी झाली आणि बैलांच्या कष्टाचे स्थान दुय्यम झाले. मात्र आजही भारतामध्ये ‘बैल’ श्रमसंस्कृतीचे प्रतिक मानला जातो. विसाव्या शतकात तंत्रज्ञानाची कास धरण्यापुर्वी ‘बैल’ शेतीतील सर्व कामे करत होता. असे असले तरी बैलाला शेतकऱ्याचा रान सखा म्हणून ‘काळ्या मातीतील हिरव्या जगाच्या’ कृषीसंस्कृतीमध्ये आजही अढळ स्थान आहे. शेतकऱ्याला ‘बळीराजा’ ही ओळख बैलाच्या आणि नांगराच्या जोडीमुळेच मिळाली. अनेक बळीराजांना बैलाने नवी ओळख प्राप्त करुन दिली. एका बैलाने शेतकऱ्याच्या दोन ते तीन पिढ्या जगविल्या आहेत. त्यामुळेच मागील कित्येक शतकांपासुन शेतकरी राजा बैलांचे ऋण वेगवेगळ्या माध्यमातुन मानत आला आहे. त्याच साधनांपैकी एक म्हणजे ‘बैलपोळा’. (Bail Pola Special relation and connection of farmers and bullock)
या बैलपोळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये चार वेगवेगळ्या वेळी साजरा केला जातो. पहिला कर्नाटकी बेंदुर, जो वटपोर्णिमैच्या दुसऱ्या दिवशी सांगली, कोल्हापूरमधील सीमावर्ती भागात साजरा केला जातो. दुसरा महाराष्ट्रीयन बेंदुर, जो आषाढी पौर्णिमेला साजरा करतात. तिसरा असतो वैदर्भियन बैल पोळा. हा विदर्भ आणि मराठवाड्यात श्रावणी अमावस्येला साजरा केला जातो. तर चौथा येतो भादवी पोळा, जो पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या काही भागात साजरा केला जातो. एकाच महाराष्ट्रात एक सण चार वेगवेगळ्या वेळी साजरा करीत असल्यामुळे प्रादेशिक वैविध्यतेचा वैशिष्ट्यपूर्ण सण म्हणून ‘पोळा’ ओळखला जातो. हा सण साजरा करण्याचे दिवस जरी वेगवेगळे असले तरी सगळ्यांचा उद्देश एकच तो म्हणजे बैलाचे आभार मानणे, त्याच्या ऋणात राहणे. याच चार वैशिष्ट्यपूर्ण बैलपोळ्यांमध्ये आज आपण वैदर्भियन पोळ्याविषयी माहिती समजून घेणार आहोत.
विदर्भातील शेतकरी लाईफकट्टासोबत बोलताना काय म्हणाले?
आपण वेगवेगळे प्राणी पाळत असतो त्यांच्यासोबत आपण भावनिकरित्या कनेक्टही होतो तसाच एक शेतकऱ्यांचा अगदी जिव्हाळ्याचा प्राणी म्हणजे बैल. या यांत्रिक युगात आजही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आपल्या सरज्या अन् राजाची साथ सोडली नाही. या मुक्या प्राण्यासोबत शेतकऱ्याचेही भावनिक बंध जुळले असतात. शेती हा शेतकऱ्याच्या जगण्याचा आणि आपल्या देशाच्या तिजोरीचा पाया आहे. शेतीला साथ देणारे बैल म्हणजे शेतकऱ्याची लेकरं आहेत. मालकाची दुरून कानावर पडणारी एक हाक बैलांना साद घालत असते, मालकाचा पाठीवरून फिरणारा प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा एक हात बैलांना सुखावून जातो. दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी शेतकऱ्याचं बैलाला कुरवाळणं पुरेसं असतं. आणि याच नात्यातून बैलाच्या परिश्रमाचे आभार मानन्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो. म्हणून पोळ्यानिमित्त आम्ही विदर्भातील काही शेतकऱ्यांसोबत संपर्क साधला.
बैलाच्या परिश्रमाचे आभार मानन्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो. म्हणून पोळ्यानिमित्त आम्ही विदर्भातील काही शेतकऱ्यांसोबत संपर्क साधला.#pola #bailpola #bailpola_festival #maharashtra #maharshtrafestival #lifecoach #farmers #farmerlife #lifekatta pic.twitter.com/RFMwOiIi4F
— Life Katta (@LifeKatta) September 14, 2023
हा सण श्रावण महिन्यात पिठोरी अमावसेला महाराष्ट्राच्या विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वैदर्भीय संस्कृतीत साजरा होणारा पोळा तीन दिवस चालणारा सण आहे. पोळ्याच्या आदल्या दिवशी पळसाच्या पानांनी बैलांची ‘कान शेकणी’ केली जाते व बैलांना दुसऱ्या दिवशीच्या जेवणाचे आवतण (आमंत्रण) देण्यात येते. या कान शेकणीच्या पुजेत काकडी पुजण्याची प्रथा आहे. पोळ्याच्या दिवशी बैलांना नदीवर/ओढ्यात नेऊन आंघोळ घालतात. त्याच्या मानेवर हळद व तुपाने किंवा तेलाने शेकतात, याला ‘खांद शेकणे’ अथवा ‘खांड शेकणे’ म्हणतात. (ज्याच्या मानेवर भार टाकुन वर्षभर शेतीतील सर्व कामे केली जातात, त्यामुळे त्याचे ऋण व्यक्त करण्यासाठी) त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके (बारक्या मडक्याला सुत गुंडाळुन ते लाल रंगाच्या पाण्यात बुडवून त्याचे ठिपके), शिंगांना बेगडं, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा, पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालुन सजवले जाते. त्याला खायला गोड पुरणपोळी देतात.
बैलाची निगा राखण्यास ‘बैलकरी’ घरगडी असेल तर त्याला नवीन कपडे देण्यात येतात. यानंतर गावच्या हनुमानाच्या मंदीराच्या दिशेने बैलांची वाजत-गाजत मिरवणूक सुरु होते. सर्वात पुढे गावच्या पाटलांची मानाची बैलजोडी (मानवाईक) असते. गावाच्या सीमेजवळच्या शेतावर आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करतात. हनुमान मंदिरावर आल्यानंतर हे तोरण तेथे बांधतात व रक्षाबंधनला बांधलेल्या राख्या सोडुन आजच्या दिवशी या तोरणावरुन फेकुन देतात. यानंतर ‘झडत्या’/ उपहासात्मक (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे. वाटी रे वाटी खोबऱ्याची वाटी, महादेव रडे दोन पैसा साठी, पारबती च्या लुगडया ले छप्पन गाठी, सरकार कवा धावल गरीबा साठी.. एक नमन गवरा पारबती हर बोला हर हर महादेव… हरी रे हरी रे भाजल्या तूरी, हरी ची बायको तूर तूर करी… एक नमन गौरा पार्वती हरभरा महादेव बोला एक नमन गिर्जा पार्वती हरभरा हर हर महादेव…. त्यानंतर, ‘मानवाईक’ तोरण तोडतो. त्या तोरणाचे पान हळदीचा घाटासोबत प्रत्येक बैलजोडीच्या मालकाला दिले जाते व ते पान वर्षभर जपुन ठेवतात. यानंतर पोळा ‘फुटतो’. नंतर घरी नेऊन त्यांना पाय धुवून ओवाळतात. यावेळी आरतीमध्ये पोळ्यातुन आणलेला घाट टाकला जातो.
पुढे मग बहिण-भावांचा खेळ सुरु होतो. रक्षाबंधनपासुन बहीण काकडी खात नाही. त्यामुळे पोळा करुन भाऊ घरी आला की कान शेकणीच्यावेळी पुजलेली काकडी भावाच्या पाठीवर फोडून ते प्रसाद म्हणुन वाटले जाते व काकडीचे थालीपीठ करुन बहीण काकडी खायला सुरवात करते. शेवटच्या म्हणजेच तिसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा केला जातो. या दिवशी चिमुरडे लहान मातीचा बैल घेतात. त्याला छान रंगरोटी, हार फुले घालून सजवतात व आजुबाजुच्या घरांमध्ये जावून पोळी, चॉकलेट मागतात. येणाऱ्या पिढीला बैलांविषयी आणि प्राण्यांविषयी भुतदया निर्माण व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
(SpecialStory by Lifekatta)