Gender Equality : खरं समानतेच्या जेंडर इक्व्यालिटीच्या गोष्टी करणाऱ्या महान महिलांना मला हे सांगायचं आहे की, काही हक्क मिळत नसतात किंवा काही जागा आपल्यासाठी राखीव नसतात. काही ठिकाणी हक्क मिळवावे आणि पाय ठेवायला जागा करावी लागते. नेहमी घरातील महत्वाची चर्चा असो वा गावच्या हॉटेल वर दिसणारी पुरुषांची गर्दी असो, हे चित्र बघून आपलं तिथं काय काम अस म्हणणाऱ्या पहिल्या महिलाच असतात. एकीकडे बसमध्ये राखीव महिला सिटसाठी भांडणारी महिला जेव्हा पुरुषांच्या खाली सिटवर जाऊन बसते तेव्हा मात्र मला हसायला येतं. आम्ही पुरुषांनी जर बसमध्ये आमच्या हक्कासाठी असच भांडण केलं तर समाज आमच्याकडेच बोट दाखवणार. (Dear Ladies Stop comparing men and women)
तर प्रसंग असा झाला की, मैत्रीणीला घेऊन एका फुटपाथवर नाश्ता करायला गेलो. तिथली पुरुषांची गर्दी बघून ती काही पुढं येईना. म्हणे, ‘सगळे पुरुषच आहेत बाई कुणी दिसत नाही.’ मी म्हटलं ही सगळी माणसंच आहेत भूत नाही. 20 ते 25 पुरुष एका वेळी त्या ठिकाणी नाश्ता करत होते. त्यात मी माझ्याबरोबर तुला इथेच नाश्ता करावा लागले हे स्पष्टच सांगितलं. कारण चांगली चव चाखायचा हक्क तिलाही आहे. पण ती जरा ऑकवर्ड फील करायला लागली. नको तिथं महिलांवर लेक्चर देणारी ती आज मात्र तिच्याच शब्दात अडकली होती आणि मी ती संधी कशी सोडणार?
म्हटलं, एरवी महिलांना हक्क नाही म्हणून ओरडत असता आणि आज एक पुरुष तुला चारचौघात नेऊन पूर्ण स्वतंत्रपणे जगण्याची संधी देतोय तर तू सगळे पुरुष आहे म्हणून घाबरते. काही ठिकाण आणि काही जागा सगळ्यांसाठी खुल्या असतात आपण आपल्या भोवती वर्तुळ आखून घेतो आणि मग हक्कासाठी भांडत बसतो.
आज जर एक महिला या ठिकाणी नाश्ता करायसाठी थांबली तर उद्या तिला बघून 4 महिला थांबतील. तेव्हा तुम्ही जर ती महिला असाल जिला पुरुष आहे म्हणून मी कशी जाऊ, मी कशी बोलू म्हणून ऑकवर्ड वाटत असेल तर हा माझ तिला सांगण आहे की, भित्रेपणा सोडा. आज तुम्ही तिथे जागा केली तर तुमच्या मागून येणाऱ्या चार महिलांनाही जागा मिळेल. आपल्या भोवतालची वर्तुळ तोडा; कारण पुरुष तुम्हाला खाणारा वाघ नाही आणि तुम्ही कुणाची शिकार नाही.
फुटपाथवर असलेल्या या नाश्ता गाडीची गोष्ट छोटी आहे पण मी अनुभवलेला प्रसंग, महिला म्हणून विचार करणारी माझी मैत्रीण, पुरुषांची गर्दी बघून ठरवली जाणारी मत आणि बरच काही मला सकाळी सकाळी बघायला मिळालं, गोष्टी खूप छोट्या असतात त्यातून आपण जगण्याचा मार्ग कसा काढतो यावर तुमची पुढची वाट ठरत असते. स्त्री असो वा पुरुष एकमेकांना समानतेची वागणूक तर देऊन बघा!
समानतेच्या गोष्टी केल्यापेक्षा समानतेची वागणूक ठेवा. स्त्री पुरुष तुलना करणे आधी महिलांनी बंद करा. कारण सगळेच पुरुष सारखे नसतात. अनेकजण गर्दीच्या ठिकाणी तुमच्यासाठी बाजूला होणारे, एक पाऊल मागे घेणारे आणि तुम्हाला सिक्योर फील करून देणारेही असतात. जे समानतेच्या बाजूने आहे त्यांच्या कडे लक्ष द्या आणि पुढे चालत रहा. बाकी टिका टिप्पणी तर सुरूच राहणार त्यात तुमच्यासाठी तुम्ही जागा करणं शिका.
हा लेख लिहिणारा मुलगा समानतेला न्याय देण्याचे काम करतो यादरम्याने त्याने आपल्या मैत्रिणीसोबत अनुभलेला प्रसंग आमच्यासोबत शेअर केला आहे.