Menstrual Health : आठवड्याचा पहिला दिवस सोमवार म्हणजे कामाची लगबग. कोणत्याही कंपनीचा मॅनेजर असो वा त्याच्या हाताखाली काम करणारी टीम असो, त्याला कामचा लोड असतोच. घरात वावरणाऱ्या गृहिणीबाबतही असचं काहीसं चित्र बघायला मिळतं. नवऱ्याची ऑफिसला जायची घाई असो वा मुलांची शाळेची घाई. नव्या जोशानं सगळं काम सुरू करते. पण कधी कधी एखाद्या महिला एम्प्लॉयच्या बाबतीत काहीतरी उलट घडते आणि सगळे वारे फिरतात. (Menstruation and problems of working women)
आज मी तुम्हाला कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करणाऱ्या अशा अनेक मुली आणि स्त्रियांची व्यथा सांगणार आहे, जी मी स्वतः अनुभवली आहे. माझे रविवारी पिरियड्स आलेत आणि मला सोमवारी सकाळी 6 वाजता कामाला सुरुवात करायची होती. घरून काम असल्याने मी रिलॅक्स होती. म्हटलं दुखलं तरी मी सकाळी उठून आरामात काम करेन. पण झालं उलट. मला नेहमीप्रमाणे मासिक पाळीचा भयंकर त्रास व्हायला लागला आणि रात्रीची झोप उडाली.
सकाळी एक व्हिटॅमिनची टॅब घेऊन झोपली तर मॅनेजरच्या कॉलनेच मला जाग आली. माझी ताडकन झोप उडाली. घड्याळ बघितलं तर काटा 9 कडे सरकत होता. पुढे काय होणार हे क्षणात लक्षात आलं. कॉल उचलला मॅनेजरची बडबड सुरू झाली. ‘सकाळ पासून तुम्ही काहीच काम केलं नाही, हे काय केलं? ते कसं होणार? कुठे गायब आहात तुम्ही? कळवायच नाही का? बेजबाबदार आहात का? ही काय पद्धत आहे? आम्ही तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? करा तुम्ही आराम बोलू आपण’, असं म्हणून मॅनेजरने फोन आपटला.
त्याला मी स्पष्टीकरण द्यायचा अयशस्वी प्रयत्न केला. ‘मला पिरियड्स आलेत आणि मला त्रास होत आहे या नादात मला झोप लागली. मी तासभरात कामाला सुरुवात करते.’ पण अस काहीही झालं नाही. माझा त्रास वाढत गेला शेवटी हताश होऊन पुन्हा झोपली. डोळ्यात पाणी होतं, पोटात आणि पाठीत दुखत होतं, पेटके येत होते, ब्लड प्रेशर डाऊन झाला होता आणि घरी कुणी नव्हतं. अशात उठून कसं तरी आवरलं आणि काही तरी खायचं घेतलं ग्लास भर पाणी पिऊन बसले.
हे सगळं सांगण्याचा उद्देश हाच की मॅनेजरला बायको आणि मुली नसतील का हा प्रश्न मनात आला. त्यानंतर महिलांचा हा मासिक पाळीचा त्रास कंपनी का समजून घेत नाही? शरीरात होणारे हार्मोनल बदल या काळात मोठ्या प्रमाणात होते, तुमच्या स्वभावावर या 4 दिवसात नियंत्रण राहत नाही, त्यात होणाऱ्या वेदना भयंकर असतात.
तुम्हालाही असा त्रास होत असताना तुम्ही ऑफिसला किंवा घरी काम केलं आहे का? तुम्हीही दबावात येऊन जबाबदारीच टेन्शन घेऊन मासिक पाळीच्या वेदना सहन करून काम करत असाल तर थांबा. आपल्या वडील, भाऊ, नवरा, मुलगा यांना आपल्याला मासिक पाळीत त्रास होतोय, तुमच्या कंबरेची वाट लागली आहे हे समजू द्या. कारण आज 4 दिवस तुम्ही आराम केला तर पुढचे महिनाभर तुम्हाला काम करण्याची शक्ती मिळेल.
या 4 दिवसात स्वतःला त्रास करून घेतला तर हे दुखणं दर महिन्याला वाढत जाणारं आहे. घर आणि ऑफिस दोन्ही पळून जाणार नाही. कारण त्यासाठी जेवढी मेहनत तुमचा नवरा आणि मॅनेजर घेत असतो तेवढीच तुम्हीही घेत असता. त्यामुळे या 4 दिवसाच महत्व समजा आणि आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. मी असं नाही म्हणत की सगळ्याच महिलांना त्रास होतो. पण काहींचा त्रास खरच जेन्युअन असतो. त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण आज तुम्ही सुरक्षित आणि हेल्दी रहाल तर उद्या कंपनी आणि घरासाठी काम करू शकाल.
महिलांच्या मासिक पाळीच्या काळाचा विचार करता काही देशांमध्ये पिरियड्स लिव्ह लागू केल्या आहेत, भारतही अशा लिव्हच्या प्रतिक्षेत आहे. भारतात अनेक महिला कामगार आहेत, काही महिला सार्वजनिक वाहनांनी प्रवास करून ऑफिस गाठतात. त्या दरम्यान होणारा त्रास काय असतो हे मी 2 वर्ष अनुभवलं आहे. त्यामुळे आपली काळजी घ्या. हा त्रास होऊ नये म्हणून व्यायाम करा आणि हेल्दी आयुष्य जगा.