Instagram Reels : आजच्या तरुण पिढीच्या हाताची मनगट आणि डोळे लवकर कामातून जाण्याच कारण म्हणजे वाढता स्क्रीन टाइम. तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघू शकता अनेक मुलामुलींना चष्मा लागलेला आहे आणि ते सतत त्याच्या गॅझेटमध्ये डोकं घालून असतात. आधी फोटो व्हिडिओ आठवणी जपून ठेवण्यासाठी काढले जायचे आता तेच फोटो इंस्टा स्टोरी आणि व्हिडीओ रिल्स साठी काढले जातात. पण तुम्हाला माहित आहे का हे शॉर्ट व्हिडीओ आणि इंस्टा रिल्स तुमच्या कुठेतरी अपेक्षा वाढवत असतात. (Scrolling Instagram reels is increasing expectations of youth)
कालचाच प्रसंग मी तुम्हाला सांगते, मैत्रिणीला म्हटलं किती रिल्स बघणार ठेव फोन आणि झोप. तर ती त्यावर म्हणाली थांब 12 वाजूदे , तोपर्यंत मी बघणार आणि मगच झोपणार! तिचं हे उत्तर ऐकून मला धक्काच बसला, म्हणजे मोबाईल बघायचा आणि रिल्स स्क्रोल करायचा वेळ या तरुणाईने सेट केला आहे आणि हा वेळ सेट केला नसेल तर….? या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हीच शोधा.
आपण दिवसभर शाळा, कॉलेज, जॉब, प्रवास, ऑफिस वर्क, स्टडी अशा कितीतरी गोष्टी करतो. त्यात रात्री घरी आल्यानंतर एकदाच जेवण झालं की झोपुन मोबाईल बघायला लागतो. या वेळेत आपला मेंदू थकलेला असतो, तरीही आपण रिल्स स्क्रोल करत असतो. ऑफिस मध्ये जरा वेळ मिळाला की आपण रिल्स बघतो, जेवताना एका हातात मोबाईल आणि एका हातात अन्नाचा घास असतो. हे चित्र आपल्याला घरोघरी बघायला मिळते. या अनलिमिटेड रिल्स बघून डोळ्यांची अपेक्षा वाढलेली असते कारण हे व्हिडीओ कुठेतरी रिलेट करणारे आपल्याला सुखावणारे असतात. त्यातली काही व्हिडीओ मनोरंजनासाठी असतात हे विसरतो आणि आपण त्यात गुंतत जातो.
त्यात दुसरा प्रकार येतो हे रिलेट वाटत असलेले रिल्स इतरांना फॉरवर्ड करणे. मुळात या रिल्स बघून आपल्या अपेक्षा वाढत आहेत हे आपल्या लक्षात येणं बंद झालंय. मित्र-मैत्रिणी, नवरा-बायको, कलीग-कझन हे रिल्स बघून एकमेकांकडून अवाजवी अपेक्षा करायला लागले आहेत. माझा विचार बरोबर आहे की चूक हे तपासण्यासाठी मी काही तरुणाशी संपर्क साधला.
त्यापैकी, एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीने सांगितले की, ‘हो मला रिल्स बघून मित्रासोबत फिरायला जायला आवडतं. रिल्स मध्ये दाखवते तसे फोटो शूट किंवा व्हिडीओ करायला आवडते, पण माझ्या पार्टनरला या गोष्टी जमत नाही आणि मग कुठेतरी मी निराश होते आणि यावरून कधी कधी आमच्यात वादही होते.’
एका दुकानात काम करणाऱ्या मुलाने आपला अनुभव शेअर करताना सांगितलं की, ‘हे रिल्स बघितले की नवनवीन कल्पना सुचतात, फॅमिली प्रोग्राम मध्ये किंवा बाहेर ठिकाणी गेल्यावर मला असाच व्हिडीओ शूट करायचा असतो, काही सपोर्ट करतात तर काही नाही करत. पण माझ्या जवळच्या लोकांनी रिल्स साठी कंटेंट क्रियेट करण्यास मदत करावी ही माझी अपेक्षा असते.’
आता एका नवीन कपलने आपला अनुभव शेअर केला ते म्हणाले, ‘दिवसभरातून आम्ही एकमेकांना 10 ते 12 रिल्स फॉरवर्ड करतो, का तर त्या आमच्या लाईफ ला रिलेट करतात म्हणून. पण कधी कधी काही रिल्स अवाजवी असतात ज्याचा आपल्या लाइफस्टाइलशी काही संबंध नसतो तरी त्या फॉरवर्ड केल्या जातात. त्यानंतर तू तस वागावं, तू तस बोलावं, रिल्स मध्ये दिसत असलेल्या मुलीसारखी माझी बायको सुंदर दिसावी किंवा रिल्स मध्ये दिसत असणाऱ्या मुलांप्रमाणे माझ्या नवऱ्याने मोठे Advenchar करावे अशी अपेक्षा मनात जागृत होते. कधी कधी तर आम्ही एकमेकांशी बोलणं सोडून रात्री आपआपल्या मोबाईल मध्ये रिल्स किंवा शॉर्ट व्हिडीओ बघत असतो. यादरम्यान आम्ही एकमेकांना वेळ देणे सोडून मोबाईल बघत असतो आणि जोपर्यंत आमच्या ही गोष्ट लक्षात येते तोपर्यंत झोपेचे आगमन झाले असते.’
आता वरील प्रसंग ऐकून तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा, खरच रिल्स तुमच्या अपेक्षा वाढवतात का? तुमचा टाईमपास होऊन तुमच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो का? किंवा रिल्समुळे तुम्हाला कुठे चांगली मदत झाली का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्हाला कमेंट करा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा.