How To Selecting Life Partner : जर तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून लग्नाबद्दल सतत त्रास दिला जात असेल तर आताच्या काळात मुलामुलींवर लग्नासाठी असा दबाव टाकणे चांगले नाही. जोडीदाराकडून आपल्या काय अपेक्षा आहेत, आपल्याला तो कसा असायला हवा हे समजून घेण्यासाठी वेळ घ्या आणि त्यानंतर लग्नाचा निर्णय घ्या. प्रेम झालं किंवा रिलेशनशिपमध्ये आहे म्हणून लग्नाला होकार देऊ नका. भूतकाळाचा अनुभव घेवून आणि भविष्याचा विचार करून वर्तमानात सर्व गोष्टींचा प्रॅक्टिकली विचार करून लग्नाचा निर्णय घ्यावा असा सल्ला मी प्रत्येक मुलामुलींनी देईल.(Girls should practically consider these five things while choosing life partner)
आजकाल कोणताही विवाह आदर्श पद्धतीने होऊ शकत नाही. त्यात कुठेतरी कमी जास्त, चांगलं वाईट होत असते. म्हणतात ना, ‘आपण कुणाचे हात धुवून पाहू शकतो नशीब धुवून नाही.’ प्रत्येकजण आपापल्या आवडीनिवडी, नापसंती आणि मनाच्या आवडीनिवडीनुसार वेगळा विचार करत असतात. जेवढे व्यक्ती तेवढे त्यांचे लग्नाबद्दलचे विचार वेगळे असू शकतात. एक चांगला जोडीदार शोधणे किंवा कुणालातरी कमिटमेंट देणे ही एका मिनटात होणारी जादू नाही. तुम्ही कितीही ठरवलं तरी वेळेनुसार नात्यात आणि आपल्या आवडीनिवडीत बदल होत असतात. अशा वेळी आपला पार्टनर निवडताना किंवा लग्नासारखा मोठा निर्णय घेण्यापूर्वी मुलींनी या पाच गोष्टींचा प्रॅक्टिकली विचार करायला हवा.
भविष्यासाठी तुम्हा दोघांच्या योजना काय आहेत?
तुमचे भविष्य एकत्र कसे असेल हे तुमचे खर्च आणि बचतीबाबत तुम्ही किती तयार आहात यावर अवलंबून आहे. कारण चांगल्या जीवनशैलीसाठी आयुष्यात आर्थिक पाठबळ असणे खूप महत्वाचे आहे. यासोबतच भविष्यासाठी तुमची किंवा तुमच्या पार्टनरची काय तयारी आहे आणि तुम्ही आर्थिक समस्या कशा हाताळता या गोष्टीचा विचार करणे खूप आवश्यक आहे. मानसशास्त्रानुसार, आर्थिक नियोजनावर चर्चा केल्याने दोघांनाही भविष्याबद्दल स्पष्टता येईल. याचा फायदा असा होईल की, भविष्यात तुमचे आर्थिक कारणांवरून वाद होणार नाही.
कौटुंबिक चालिरिती आणि प्रथापरंपरा
बहुतेकदा लोक हा मुद्दा टाळतात अनेकांना या गोष्टी जास्त महत्वाच्या वाटत नाहीत. परंतु एक नातेसंबंध संपूर्ण कुटुंबाला दोन व्यक्तींद्वारे जोडतात. म्हणून तुम्ही दोघांनी कौटुंबिक चालीरीती आणि तुमच्या वैयक्तिक विश्वासाबद्दल आधी चर्चा करावी. अन्यथा, लग्नानंतर तुम्ही कौटुंबिक दबाव आणि तुमच्या अति आत्मविश्वासांमध्ये अडकू शकता. उदाहरणार्थ, जरी तुमचा कोणत्याही प्रथेवर विश्वास नसला तरी, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत त्या प्रथा फॉलो कराव्या अशी अपेक्षा करणे सहाजिक असते. लग्नाआधी किंवा नंतर नातेसंबंध या कारणांमुळे बिघडतात म्हणून या विषयांवर अनेकजण चर्चा करणे टाळतात पण तुम्ही असे करू नका. मुलाशी चर्चा केल्यानंतर, त्याची मूल्ये, विश्वास आणि जीवनातील अपेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांचे कुटुंब आणि मित्रांसोबतचे त्यांचे नाते कसे आहे हे समजून घेण्यासाठी प्रयत्न करा. जेव्हा दोन कुटूंब एकत्र येतात तेव्हा विचारांची, चालिरिती आणि प्रथापरंपरांची देवाणघेवाण होणे गरजेचे आहे.
नातेसंबंधातील अपेक्षा
नातेसंबंधातील तुमच्या अपेक्षांबद्दल तुम्ही खुलेपणाने चर्चा केली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला नंतर मतभेदांना सामोरे जावे लागणार नाही. तुमच्या भावी जोडीदाराकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? किंवा तुमच्या नात्याबद्दल तुमच्या काय अपेक्षा आहेत. यासोबतच तुम्हाला तुमच्या नात्यात किती स्पेस किंवा जवळीक हवी आहे हे बोलून दाखवा. मुलगा मुलीच्या मनातील भावना मसजून घेतो हा डायलॉग चित्रपटातच शोभतो. खऱ्या आयुष्यात आपल्याला काय हवं नको, आपली आवड, पसंत-नापसंत, होकार असो वा नकार, स्पष्टपणे बोलून दाखवणे गरजेचे आहे. नात्यात मोघमपणा ठेवल्याने गृहित धरण्याचे प्रमाण वाढते. यामुळे मतभेद होऊ शकतात म्हणून एकमेकांच्या अपेक्षा जाणून घेणे महत्वाचे आहे.
एकमेकांचा कम्फर्ट लेव्हल समजून घेणे
तुम्ही दोघांनीही एकमेकांच्या कम्फर्ट लेव्हलबद्दल बोलले पाहिजे. याच्या मदतीने तुमचा पार्टनर कोणत्या गोष्टींसाठी अधिक सोयीस्कर आहे किंवा कोणत्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करू इच्छित आहे हे तुम्हाला समजू शकेल. तुमच्या नात्याला वेळ द्या आणि सर्व मुद्द्यांवर एकमेकांची कम्फर्ट लेव्हलला येवून समजून घेण्याचा प्रयत्न करा. यामध्ये तुम्ही वैयक्तिक आयुष्य, सामाजिक जीवन आणि लैंगिक इच्छांबद्दलही मोकळेपणाने बोलू शकता. आपल्या भावी जीवनसाथीच्या बुद्धिमत्तेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच तो किती शिक्षित आहे किंवा तुमची शैक्षणिक पात्रता आणि नोकरी याकडे तो कसा बघतो याचा विचार करा.
तुमच्या जोडीदाराने तुम्हाला समजून घ्यावे आणि तुमच्या कामाला पाठिंबा द्यावा असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही प्रॅक्टिकली विचार करत आहात. तो तुम्हाला लग्नानंतरही काम करण्यास प्रोत्साहित करत असेल किंवा गृहिणी म्हणूनही तुमचा सन्मान करत असेल, तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पूर्ण सहकार्य करत असेल, तर अशी व्यक्ती जीवनसाथी बनण्यासाठी योग्य आहे. म्हणून लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी, एकमेकांची कम्फर्ट लेव्हल समजून घेणे खूप आवश्यक आहे, यामुळे तुम्हाला एकमेकांमधील साम्य आणि फरक समजण्यास मदत होईल.
एकाच बैठकीत सर्व काही ठरवू नका
काही वेळा बराच वेळ बोलूनही एखाद्याला समजने खूप कठीण जाते. ही समस्या निश्चितपणे लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये उद्भवते, कारण तुम्ही त्या व्यक्तीला समोरासमोर भेटू शकत नाही.जास्तीत जास्त बोलण फोनच्या किंवा MSGच्या माध्यमातून होत असते. म्हणूनच, केवळ एका भेटीवर अवलंबून न राहता, आपल्या नात्याला वेळ देण्याचा प्रयत्न करा, या काळात तुम्ही एकमेकांना अनेक वेळा भेटले पाहिजे यावरून समोरचा व्यक्ती कसा आहे तो इतरांशी कसा वागतो किंवा तो समाजात कसा वावरतो हे दिसून येते. जोडीदार असा असावा जो स्वत:च्या आणि इतरांच्या विचारांचा आदर करतो आणि नात्याचे महत्त्व समजतो. लग्नाआधी काही भेटींमध्ये तुम्हाला जर आपल्या पार्टनरचा सोशल बिहेव आवडला नाहीत तर त्या नात्यात पूढे जाऊ नका. अन्यथा तुम्हाला नंतर पश्चात्ताप करावा लागू शकतो. नातेसंबंध, प्रेम आणि वैवाहिक जीवन याबद्दल मुलाचे काय विचार आहे? ती मुलगी किंवा मुलगा एकमेकांच्या घरातील सदस्यांचा आदर करेल की नाही? असा काही प्रॅक्टिकली गोष्टींचा विचार करून पूढे जावे लागले.
हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे
पार्टनर निवडणे हा तुम्ही घेतलेल्या सर्वात महत्वाच्या निर्णयांपैकी एक आहे. एकदा करिअर निवडताना चूक झाली तर ती आपल्याल्या पूढे जाऊन सुधारता येवू शकते. पण लग्नाचा निर्णय खूप विचारपूर्वक घ्यावा लागतो. कारण या नात्यामध्ये यूटर्न नसतो आणि असला तर सोबत पश्चातापाशिवाय काही येत नाही. तुमच्या जोडीदाराच्या निर्णयाचा तुमच्या जीवनातील सर्व क्षेत्रांवर परिणाम होतो.
मुला मुलींचे विचार जुळल्यानंतर दोघांच्याही फॅमिली बॅकग्राउंडचा देखील विचार करावा. कारण दोन व्यक्ती दोन कुटूंबाला जोडत असतात. तेव्हा मुलामुलींच्या निर्णयात फॅमिलीचा सहभाग असणे खूप महत्वाचे असते. कारण भविष्यात अडचणी आणि आनंदाच्या काळात सुख-दु:ख वाटून घ्यायला फॅमिली आणि हक्काची नाती आवश्यक असतात. यामुळे नात्यात आनंद तर राहतोच त्याचबरोबर फॅमिली आपल्यासोबत आहे या विश्वासावर आपण जग जिंकू शकतो ही फिलींग आपल्याला अनेक अवाहनांना तोंड देण्यासाठी प्रोत्साहित करत असते.
हा एक महत्त्वाचा निर्णय आहे आणि त्यासाठी विचारमंथन आवश्यक आहे. लग्न करताना तुम्ही फक्त तुमचा जोडीदारच निवडत नाही तर तुमच्या मुलांसाठी भविष्यातील वडील आणि तुमच्या आई-वडिलांसाठी जावई देखील शोधत असता. तेव्हा असे निर्णय हुशारीने घ्या या निर्णयात घाई करू नका. मोठ्यांचा सल्ला आणि अनुभव तुम्हाला या निर्णयात कामी पडू शकतो.