Love Marriage : प्रेमविवाह करताना कुटुंबातील सदस्यांची परवानगी मिळवणे किंवा त्यांना पटवून सांगणे हे खूप अवघड काम असतं. कोणतंही प्रेम प्रकरण अतिशय संवेदनशीलपणे हाताळताना प्रत्येक आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागते. सगळ्यात महत्वाचं धाडस करणं असतं. काही गोष्टी प्रामाणिक आणि सकारात्मक विचार ठेऊन केल्यास आपल्या प्रेमाला कुटुंबाकडून नक्कीच परवानगी मिळू शकते. (How to get permission from family during Love Marriage)
एक्सपर्टचा सल्ल्ला :
1. सगळ्यात महत्वाची आणि अवघड गोष्ट, प्रेमविवाहाला कुटुंबियांची सहजासहजी परवानगी मिळण्यासाठी वेळ लागू शकतो हे कायम लक्षात ठेवा. विरोध आणि चढ-उतरांसाठी नेहमी तयार रहा.
2. आपल्या प्रेमाबद्दल कुटुंबातील सदस्यांबरोबर प्रामाणिक आणि धीराने चर्चा करा. यासाठी योग्य परिस्थिती बघून वेळ निवडा. आपल्या मनातील भावना त्यांच्यासमोर संयमाने व्यक्त करा.
3. आपल्या कुटुंबियांचा विचार आणि त्यांची काळजी समजून घ्या. तुमचं मत मांडताना किंवा मांडण्यापूर्वी त्यांना काय म्हणायचे आहे ते जाणून घ्या.
4. तुमचा जोडीदार निवडण्याची कारणे स्पष्टपणे व्यक्त करा. जोडीदाराची चांगली कामे आणि गुण हायलाइट करा आणि तुमच्या विचारांबरोबर ते कसे जुळतात, ते शांतपणे मांडा.
5. तुमच्या कुटुंबातील सांस्कृतिक, सामाजिक स्थिती किंवा इतर कोणत्याही गोष्टीत फरक असल्यास त्यांचे निवारण करा.
6. प्रसंगी गरज पडल्यास, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक किंवा मित्राच्या मध्यस्थीने तुमच्या भावना प्रभावीपणे व्यक्त करा. यामुळे कुटुंबाला धीर देण्यास मदत होऊ शकते.
7. तुमच्या आसपास किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने प्रेमविवाह केला असल्यास, त्याचा दाखला द्या. यामुळे त्यांची काळजी कमी होण्यास नक्की मदत मिळेल.
8. तुमच्या प्रेमाबद्दल माहिती दिल्यानंतर त्यावर विचार करण्यासाठी कुटुंबाला वेळ द्या आणि त्याच्याशी जुळवून घ्या. त्वरीत निर्णय घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकणे टाळा.
9. तुम्ही निवडलेला जोडीदार समजूतदार असल्याची जाणीव करून घ्या.
10. शक्य असल्यास, तुमचे प्रेम आणि नातेसंबंध यांची तडजोड न करता तुमच्या कुटुंबामध्ये काही समस्या असल्यास त्याचे निवारण करा. किंवा काही तडजोड करून त्यावर उपाय मिळत असेल तर तयारी दाखवा.
11. कौटुंबिक चर्चा जर भावनिक किंवा त्रासदायक होत असल्यास शक्य तेवढे शांत राहण्याचा प्रयत्न करा.
12. तुमच्या नात्यातील सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा.
13. जोडीदाराला मान्य असल्यास, कौटुंबिक चर्चेत दोन्ही कुटुंबांना सामील करून घ्या आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा.
लक्षात ठेवा, तुमच्या कुटुंबाला सहजपणे पटवणे कधी अवघड तर कधी खूप सोपी गोष्ट असते. प्रत्येक वेळी प्रयत्न यशस्वी होतो असे नाही. आपण प्रयत्न करत राहणे खूप महत्त्वाचे आहे. परिणाम काहीही असो, तुम्ही जो निर्णय घ्याल त्यात स्वतः च्या मतांना प्राधान्य द्या. स्वतःचा आणि तुमच्या जोडीदाराच्या आनंदाला प्राधान्य द्या.
आणखी एक गोष्ट सगळ्यात महत्वाची.. .तुम्हाला तुमचा जोडीदार जात, धर्म, वर्ग, लिंग, या सगळ्याच्या सीमा ओलांडून निवडण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य आहे हे देखील विसरू नका..प्रत्येक निर्णय घेताना संयमाने घ्या. प्रत्येक प्रेमप्रकरण वेगळं असतं सगळे नियम सगळ्यांचा लागू होतील असे नाही.
- के. अभिजीत – (Right to love ग्रुपचे प्रमुख)
Right to love हा ग्रुप आठ वर्षांपासून प्रेम विवाह करणाऱ्या जोडप्यांना लग्नापूर्वीची आणि नंतरची कायदेशीर मदत करतो. तसेच जोडप्यांना कायदेशीर सल्लेही देतो. काही चुकीचे होत असल्यास समुपदेशनच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शनही करतो आणि आपल्या आयुष्याची सुरवात करण्यासाठी मदतही करतो. आजवर या संस्थेने 150 हून अधिक जोडप्यांना प्रेमविवाहासाठी यशस्वीपणे मदत केली आहे.