तुमचं तुमच्या जोडीदारावर उत्कट प्रेम आहे, तुम्ही भविष्याचे प्लॅनिंगही करत आहात. बघणाऱ्याला सगळ्या गोष्टी नीट चालल्या आहेत असं वाटतं असतं. पण त्याचवेळी तुम्हाला नात्यातील एक गोष्ट कुठेतरी हरवली आहे, असं वाटत असतं. नात्यातील गोडवा, ओढ, ओलावा या गोष्टी आटत चालल्या आहेत, असं जाणवू लागतं. तुमच्या नात्यात काहीच नवं घडत नसतं. रस्त्याने दिशाहिन पळणाऱ्या गाडीसारखं नातं पुढे कुठे जात आहे, हे कळण्यासाठी मार्ग नसतो. अशावेळी आपल्या नात्याबद्दल आपल्यालाच विश्वास वाटत नाही.
या सगळ्या गोष्टी घडत असतानाच तुम्हाला या नात्यातून बाहेरही पडायचे नसते. आपला पार्टनर भविष्यात सोबत हवाच असतो, त्याच्याशी ब्रेकअपचे विचारच आपण करु शकत नाही. मग अशावेळी त्या नात्याला पुन्हा नव्याने उभारी घेण्यासाठी स्पेस देणे गरजेचे असते. यालाच आजच्या भाषेत नात्यातून ब्रेक घेणे असे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे तर हे ब्रेक-अप नसते तर तात्पुरते वेगळे होणे असते. ज्या जोडप्यांना थोडी स्पेस घ्यायची आहे, परंतु कायमचे संबंध तोडायचे नाहीत त्यांच्यासाठी हा चांगला फॉर्म्युला ठरु शकतो. मात्र, रिलेशनशिपमध्ये ब्रेक घेताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते. हेच नियम आपण समजून घेणार आहोत.
जोडप्यांनी कधी ब्रेक घ्यावा?
अनेकांना प्रश्न पडतो की जोडप्यांनी ब्रेक घेणे योग्य आहे का? तर मानसोपचारतज्ज्ञांच्या मते ब्रेक घेणे प्रत्येक नात्यावर अवलंबून असते. नात्यातील दोन व्यक्तींच्या स्वभावावर अवलंबून असते. पण ब्रेक घेणे हे जोडप्यांना एकत्र नसताना एकमेकांबद्दल काय वाटते हे समजण्याची तात्पुरती संधी असते. नव्याने भावना तयार होण्यासाठी हा काळ देता येऊ शकतो. या काळात त्या दोन्ही व्यक्ती त्यांच्या वैयक्तिक वाढीसाठीही वेळ देऊ शकतात. शिवाय दोघांबद्दल नव्याने विचार करु शकतात. ज्याप्रमाणे आपला मोबाईल हँग झाल्यानंतर आपण टाकून न देता तो थोडा वेळ बंद करुन पुन्हा सुरु करतो अगदी त्याचप्रमाणे ही प्रक्रिया असते.
कोणत्या परिस्थितीमध्ये ब्रेक घ्यावा?
1. तुम्ही ऑन-ऑफ सायकलमध्ये अडकला आहात :
जोडपे ऑन-ऑफच्या चक्रात अडकले असल्यास त्यांनी ब्रेक घेणे चांगले मानले जाते. ऑन-ऑफ म्हणजे काय तर भांडण झाल्यास एक-दोन दिवस एक आठवडा कोणतेही संभाषण न करता राहणे. या काळात पार्टनर दुसऱ्या पार्टनरबद्दल आलेला राग शांत करत असतो. पण वारंवार अशा गोष्टी घडत असतील आणि एका टप्प्यानंतर तुम्ही तो राग शांत करुच शकत नसाल, नात्याकडून असलेल्या अपेक्षा सोडून देता असाल तर ब्रेक घेणे गरजेचे आहे.
2. तुमचे जोडीदाराशी रिअल कनेक्शन आहे की नाही याबाबत साशंक असाल तर :
तुमचे तुमच्या जोडीदाराशी रिअल कनेक्शन आहे की नाही याबाबत साशंक असाल आणि ती गोष्ट तुम्हाला क्लिअर करुन घ्यायची असेल, तर तुम्ही तुमच्या नात्यापासून थोडा ब्रेक घेतला पाहिजे.
3. तुम्ही तुमच्या जोडीदाराला जाणीवपूर्वक टाळत आहात?
तुम्ही काही कारणास्तव कधी तरी एकटे राहणे पसंत करत असाल तर ही गोष्ट सामान्य आहे. कारण आपल्यापैकी अनेकांना आपला स्वतःचा वेळ आवडतो. विशेषतः राग शांत करण्यासाठी, दुःख कमी करण्यासाठी, मूड ठीक करण्यासाठी आपण एकटे राहतो. परंतु जर तुम्ही जाणीवपूर्वक तुमच्या जोडीदाराला टाळत असाल तर त्या नात्यात काहीतरी समस्या आहे, असे समजायला वाव असतो. अशावेळी ब्रेक घेऊन नात्याला रिस्टार्ट करणे गरजेचे असते.
4. भांडण टाळण्यासाठी खोटं बोलण्याची गरज वाटते :
अनेकदा आपण नात्यात आपल्या पार्टनरला एखादी गोष्ट पटत नसल्यास होणारा वाद टाळण्यासाठी ती गोष्ट जाणीवपूर्वक लपवून ठेवतो किंवा त्याबद्दल खोटं बोलत असतो. विश्वासाचा कस लागणार नाही, तिथे ही गोष्ट सामान्य मानली जाते. पण सतत भांडण टाळण्यासाठी खोटं बोलण्याची गरज भासू लागते आणि प्रत्येकवेळीच खोट बोलावं लागत असेल तर नात्याबद्दल पुनर्विचार करण्याची वेळ आली असे समजून जावे.
ब्रेक घेतल्याने जोडप्यांना मदत होऊ शकते?
ब्रेक घेतल्याने तुम्हा दोघांना आवश्यक स्पेस मिळते. जर तुम्ही दीर्घकालीन नातेसंबंधात असाल तर तिथे गुदमरल्यासारखे वाटू शकते. अशावेळी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत किंवा त्यांच्याशिवाय अधिक आनंदी आहात का, याची जाणीव करून देण्याची संधी तुम्हाला ही स्पेस देईल. ‘मी-टाइम’ घेण्यासाठी ‘वी-टाइम’पासून दूर राहण्याचे आणखी फायदे पाहूया!
1. ब्रेक घेतल्याने तुमचे प्राधान्यक्रम आणि जीवनातील ध्येये शोधण्यात मदत होते :
वेगळी वेळ तुम्हाला आयुष्यात काय हवे आहे यावर लक्ष केंद्रित करण्याची संधी देईल. जर तुमच्याकडे तुमच्या जोडीदारासारखी प्राधान्ये आणि जीवन ध्येये नसतील आणि तुम्ही तडजोड करू शकत नसाल, तर हे नाते तुमच्यासाठी नाही, असे समजून घ्यावे.
2. ब्रेक घेतल्याने तुम्ही सुसंगत आहात का हे समजण्यास मदत होते :
तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या प्रियकरामध्ये अनेक फरक आढळू येतात, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही सुसंगत नाही. पण जर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःच्या अनुकूलतेबद्दल शंका येत असेल तर ब्रेक घेणे ही चांगली गोष्ट आहे.
3. नात्यातील ब्रेकमुळे नाते वाचू शकते
ब्रेकअप होण्यापूर्वी ब्रेक घेणे हा एक टप्पा म्हणून पाहता येईल. यावेळेत हे नाते रिस्टार्ट होऊ शकते का? आपण आपल्या जोडीदाराला, नात्याला न्याय देऊ शकतो का? कशापद्धतीने पुढे जायला हवे याबद्दल विचार करु शकतो.
तात्पुरत्या ब्रेक-अपमध्ये या गोष्टी असायलाच हव्यात!
1. प्रामाणिक रहा :
आपण आपल्या नातेसंबंधाकडे कसे पाहता, आपण कशाची अपेक्षा करता आणि आपल्याला कसे वाटते याबद्दल प्रामाणिक रहा.
2. जबाबदारी घ्या :
ब्रेकच्या आधी, दरम्यान आणि नंतर तुमच्या भावना आणि कृतींची जबाबदारी घ्या.
3. तुमच्यासाठी ब्रेक म्हणजे काय ते समजून घ्या :
प्रत्येकासाठी नातेसंबंधातील ब्रेकची व्याख्या वेगवेगळी असू शकते. त्यामुळे तुमच्यासाठी आणि तुमच्या जोडीदारासाठी याचा अर्थ काय आहे यावर चर्चा करणे महत्त्वाचे आहे.
4. वेळ मर्यादा सेट करा :
ब्रेक घेण्यापूर्वी, शेवटची तारीख ठरवा, कारण अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतल्याने नातेसंबंधात दुरावा निर्माण होऊ शकते.
5. अपेक्षा ठरवून घ्या :
एकमेकांबद्दल वाटणाऱ्या अपेक्षा ठरवून घेतल्यास तुमच्या जोडीदाराला त्रास होण्याचा धोका कमी होईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी रोज बोलायची सवय असते तेव्हा ब्रेक मॅनेज करणे कठीण असते.
ब्रेक घेत असताना या गोष्टी करू नका –
1. आपल्या जबाबदाऱ्या सोडू नका :
जर तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे आर्थिक संबंध असतील, तर ब्रेक घेणे थोडे अधिक आव्हानात्मक असू शकते. त्यामुळे, ब्रेकच्या वेळी तुम्ही दोघे एकमेकांबद्दलच्या जबाबदाऱ्या कशा निभावाल याविषयी तुमच्या जोडीदाराशी आधी चर्चा करा.
2. ब्रेकअप टाळण्यासाठी ब्रेक घेऊ नका :
जर तुम्हाला ब्रेकअप करायचा आहे पण पार्टनरची समजूत म्हणून तुम्ही ब्रेक घेत असाल तर ही गोष्ट टाळली पाहिजे. अशावेळी ब्रेकअप करुन नातेसंबंधातून बाहेर पडण्याला प्राधान्य दिले पाहिजे.
3. परत एकत्र येण्यास भाग पाडू नका :
तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने पुन्हा एकत्र न येण्याचा निर्णय घेतल्यास ते नाते ब्रेकअपमध्ये रुपांतरित होते. अशावेळी तुमच्या जोडीदाराला तुमच्यासोबत परत येण्यास भाग पाडू नका.
ब्रेक घेतल्याने काही प्रश्न आणि शंका निर्माण होऊ शकतात. अशावेळी गरज वाटल्यास तुम्ही तुमच्या जोडीदाराशिवाय थेरपिस्टकडेही जाऊ शकता.