Right To Love : प्रेम ही एक खूप सुंदर भावना आहे, एक शाश्वत सत्य आहे. प्रेम ही अशी भावना आहे जी कायद्याच्या बंधनात नाही, नियमांच्या अधीन नाही. प्रेम हे स्वच्छ मनाने केले जाते. पण जेव्हा या प्रेमाला एखाद्या नात्यात रूपांतर करायची वेळ येते तेव्हा अनेक प्रश्न उभे राहतात. प्रेम करण्याचे स्वातंत्र्य आपल्या सर्वांना आहे. पण जेव्हा तुम्हाला तुमच्या प्रेमाचे ‘लग्न’ या नात्यात रूपांतर करायचे असते तेव्हा अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. मग ते प्रश्न सामाजिक असो, आर्थिक असो किंवा कायद्यांबाबत असो. (What should couples take care of when doing love marriage)
याच साऱ्या प्रश्नांची उत्तर मिळविण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह म्हणजेच प्रेम विवाह किंवा ठरवून विवाह करताना जोडप्यांनी काय काळजी घ्यायला हवी? किंवा ठरवून विवाह करताना काय अडचणी येऊ शकतात, आणि त्यावर कायदेशीर काय उपाय असू शकतात, याबाबत Right to love या ग्रुपचे प्रमुख के. अभिजीत यांनी माहिती दिली आहे.
Right to love हा ग्रुप आठ वर्षांपासून प्रेम विवाह करणाऱ्या जोडप्यांना लग्नापूर्वीची आणि नंतरची कायदेशीर मदत करतो. तसेच जोडप्यांना कायदेशीर सल्लेही देतो. काही चुकीचे होत असल्यास समुपदेशनच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शनही करतो आणि आपल्या आयुष्याची सुरवात करण्यासाठी मदतही करतो. आजवर या संस्थेने 150 हून अधिक जोडप्यांना प्रेमविवाहासाठी यशस्वीपणे मदत केली आहे.
आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह म्हणजेच प्रेम विवाह किंवा ठरवून विवाह करताना जोडप्यांनी काय काळजी घ्यायला हवी? याबाबत के. अभिजीत सांगतात, “यात मोठे किंवा खूप कठीण नियम नाहीत, परंतु हे नियम काय आहे ते कपल्सना माहिती असणे गरजेचे आहे.”
काय आहेत हे नियम?
1. सर्व प्रथम आपण भारतातील विवाह कायदा आणि नोंदणी प्रक्रिया तसेच भारतातील विवाहासाठी आवश्यक असणाऱ्या कायदेशीर बाबींची प्रक्रिया जाणून समजून घेणे आवश्यक आहे.
2. प्रेम विवाह करणाऱ्या जोडप्यांनी एकमेकांकडून असणाऱ्या आशा,आकांक्षा आणि अपेक्षांबद्दल खुला आणि प्रामाणिक संवाद करायला हवा जो अत्यंत गरजेचं आहे.
3. गैरसमज आणि संभाव्य संघर्ष कमी करण्यासाठी, शक्य असल्यास, तुमच्या नातेसंबंधाबद्दल आणि लग्नाच्या योजनांबद्दल तुमच्या कुटुंबियांना सांगा. यासाठी एकंदरीत कौटुंबिक परिस्थितीचा अंदाज घ्या.
4. सर्व कायदेशीर कागदपत्रे, जसे की ओळख पत्र, विवाह प्रमाणपत्र, योग्यरित्या दाखल केले आहेत आणि सुरक्षित ठेवले आहेत याची खात्री करा.
5. कौटुंबिक किंवा सामाजिक प्रतिक्रियांचा धोका असल्यास, आपल्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या आणि योग्य खबरदारी घेण्याचा विचार करा.
6. मित्र, कुटुंबातील किंवा नातेवाइकांमधील काही सदस्य तसेच इतर कायदेशीर प्रक्रियांसाठी प्रोफेशनल लोकांच्या संपर्कात राहा. तुम्हाला पाठिंबा देणाऱ्यांचा एक गट तयार करा जे गरज पडल्यास तुम्हाला मार्गदर्शन करु शकतील आणि पाठिंबा देऊ शकतात.
7. आर्थिक बाबींवर खुलेपणाने चर्चा करा. अल्पकालीन आणि दीर्घकालीन दोन्ही उद्दिष्टे लक्षात घेऊन तुमच्या सामायिक भविष्याची योजना तयार करा.
8. विरोध आणि मतभेद यांचे आदरपूर्वक आणि रचनात्मक पद्धतीने निराकरण करण्याचे प्रभावी मार्ग समजून घ्या.
9. जोडीदार म्हणून एकमेकांचे हक्क आणि जबाबदाऱ्या समजून घ्या आणि एकमेकांच्या स्वतंत्र विचारांचा आदर करा.
10. तुम्हाला तुमच्या विवाहाची किंवा वैयक्तिक सुरक्षिततेशी संबंधित कोणतीही कायदेशीर समस्या असल्यास, कायदेशीर सल्ला घ्या.
11. समज आणि आदर वाढवण्यासाठी एकमेकांची सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि परंपरा यांची जाणीव ठेवा.
12. एकमेकांच्या भावनिक आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या आणि आव्हानात्मक काळात समर्थन द्या.
लक्षात ठेवा की प्रत्येक केस मध्ये परिस्थिती वेगवेगेळी असते. परिस्थितीनुसार कोणती काळजी घायची कसे निर्णय घ्यायचे यासाठी मार्गदर्शन घ्या. तुमच्या विशिष्ट परिस्थितीनुसार आणि भविष्याच्या निर्णयानुसार मार्गदर्शनासाठी कायदेतज्ज्ञ आणि समुपदेशकांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.