Learn Local Language : सोनाली आणि तिचा नवरा अभिजीत. दोघांनी कोणत्याही ट्रॅव्हल एजन्सीच्या मदतीशिवाय 15 दिवसांची युरोप ट्रिप स्वतःच प्लॅन केली. या प्रवासात त्यांना अनेक अडथळे येणार होते. मात्र या अडथळ्यांवर मात करण्यासाठी त्यांनी एक युक्ती केली. 12 देश 6-6 मध्ये वाटून घेतले आणि प्रत्येकाने 6 देशांमधील स्थानिक भाषा अगदी बेसिक बेसिक शिकून घेतली. यातून त्यांना स्थानिक ठिकाणी फिरताना फारशी अडचण आली नाही. पत्ता विचारण, सार्वजनिक वाहतुकीचा प्रवास, खाद्यपदार्थ अशा गोष्टींविषयी माहिती घेताना, बोलताना फारशी अडचण आली नाही. (Learn local language to make strong friendship with Art culture food and people on world tour)
थोडक्यात काय तर भारतातील असो किंवा परदेशातील, कोणतेही पर्यटन स्थळ निवडताना पर्यटकांच्या वर्तनावर परिणाम करणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे भाषा. या वर्षीच्या जागतिक आकडेवारीनुसार युक्रेनियन भाषा शिकण्याचे प्रमाण वाढले आहे. गतवर्षी रशियाच्या आक्रमणानंतर जगभरातील 1.3 दशलक्षाहून अधिक लोकांनी युक्रेनियन भाषेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे तो या वर्षी सर्वात वेगाने वाढणारा अभ्यासक्रम बनला आहे.
संभाषणासाठी भाषा
इंग्रजी ही जागतिक स्तरावर शिकण्यासाठी सर्वात लोकप्रिय भाषा आहे आणि यूएस मध्ये देखील 2 क्रमांकावर आहे. रिसर्चनुसार इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन, जपानी, इटालियन, कोरियन, चीनी, रशियन आणि हिंदी या दहा भाषांचा अभ्यास सर्वाधिक केला जात आहे.
आंतरराष्ट्रीय प्रवास करताना तेथील स्थानिक भाषा शिकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रवासाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये 2023 मध्ये मोठे बदल होण्याचा अंदाज आहे. एका सर्वेक्षणानुसार, 45 टक्के अमेरिकन नागरिक भविष्यात प्रवासाला निघण्यापूर्वी तिथली भाषा शिकण्याच्या तयारीत आहेत. इतकेच नाही तर एक तृतीयांश पेक्षा जास्त (38 टक्के) अमेरिकन म्हणतात की प्रवास करताना त्यांना अडचण येऊ नये यासाठी त्यांना त्यांच्या प्रवासाच्या ठिकाणची भाषा कमीत कमी साधे संभाषण करण्यासाठी तरी शिकणे आवश्यक आहे.
भाषा आणि संस्कृती या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत
अमेरिकेप्रमाणेच भारतीय प्रवासी देखील कोव्हिडनंतर पुन्हा एकदा त्यांच्या बकेट लिस्टमधून अनुभव घेण्यासाठी त्यांचा ग्लोबल प्रवास करण्यास सज्ज झाले आहेत. पण एका सर्वेक्षणानुसार भारतीय फक्त पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी बाहेर पडत नाहीत तर ते जिथे जातात तिथल्या स्थानिक लोकांप्रमाणे राहु इच्छितात, खाऊ इच्छितात आणि प्रवास करू इच्छित आहेत. यासाठीच सर्वात महत्वाची ठरते ती स्थानिक भाषा. भाषा आणि संस्कृती या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. यापैकी एकाला दुसऱ्याची जोड असल्याशिवाय तुम्ही कुठलीही स्थानिक भाषा शिकू शकत नाही. तुम्ही जिथं जाणार आहात, ज्या शहरात, देशात प्रवास करणार आहात तिथली स्थानिक भाषा जाणून घेतल्याने स्थानिक संस्कृतीचा अधिक समृद्ध अनुभव मिळतो, असे पर्यटकांचे म्हणणे आहे.
प्रवास योजना बनवण्यासाठी भाषा महत्त्वाची गरज
कोणत्याही ठिकाणाचा सांस्कृतिक सार तिथल्या स्थानिक भाषेत असतो. भारतीय प्रवाशांना हे समजले आहे आणि ते त्यांच्या प्रवासाच्या स्थानाच्या निवडीबद्दल अधिक जागरूक होत आहेत. सर्वेक्षणानुसार सुमारे 50 टक्के लोकांनी मान्य केले की प्रवासाचे निर्णय घेताना त्यांच्यासाठी तिथली भाषा ही महत्त्वाची बाब वाटते. एखाद्या ठिकाणाची सांस्कृतिक विविधता तिच्या स्थानिक भाषेत अनुभवणे यापेक्षा चांगला मार्ग असूत शकत नाही, असेही पर्यटकांचे मत आहे.
स्थानिक भाषेची माहिती घेवूनच प्रवासाला प्रारंभ करावा
दरम्यान, भारतीय प्रवाशांची सर्वाधिक पसंतीची भाषा म्हणून फ्रेंच भाषा अव्वल स्थानी आहे. बहुसंख्य पर्यटक फ्रेंच बोलण्याच्या कौशल्यांचा सराव करण्याची योजना आखत आहेत. त्यानंतर जर्मन, अरबी आणि स्पॅनिश भाषा बोलण्यास प्राधान्य दिले जात आहे. इंग्रजी, मँडरीन, हिंदी आणि स्पॅनिशनंतर फ्रेंच ही जगातील पाचवी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. सुमारे 30 देशांमध्ये याला अधिकृत भाषेचा दर्जा आहे. संस्कृतीची भाषा म्हणून प्रसिद्ध असलेल्या फ्रेंचचे ज्ञान तुम्हाला जागतिक कला आणि साहित्यात प्रविण बनवते. म्हणून आंरराष्ट्रीय प्रवास करण्यापुर्वी तिथल्या संस्कृतीवर थोडे संशोधन केल्यास स्थानिक समुदाय आणि लोकांप्रती अधिक आदर निर्माण होण्यास मदत होते. म्हणून प्रवासाची आवड असणाऱ्यांनी स्थानिक भाषेची माहिती घेवूनच प्रवासाला प्रारंभ करावा, यामुळे तुमचा प्रवास आणि अनुभव तुम्हाला आणखी समृद्ध करतील.