Monsoon Trip Tips : मान्सून म्हंटलं की पर्यटकांसाठी दुग्धशर्करा योग असतो. ट्रेकिंग, रिव्हर राफ्टिंग अशा गोष्टींसाठी पर्यटकांच्या अंगात कमालीचा उत्साह संचारलेला असतो. याशिवाय घाट रस्त्यांवर फिरायला जाणे हे जणू शास्त्र असते. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टीवर अल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी जास्तीत जास्त पर्यटकांची झुंबड उडते. (If you are planning for a monsoon trip, you must take care of some things beforehand)
पुणे-मुंबईच्या गर्दीपासून दूर जाऊन आजूबाजूलाचा निसर्ग, उंच पर्वत, खोल दऱ्या, गड किल्ले, गर्द हिरवळ, दाट धुके असा स्वर्गीय नजारा डोळ्यात साठवण्यासाठी प्रत्येकच जण प्लॅन बनवतं आहे.
मात्र अशा ट्रीपवर जाताना नेमकं काय साहित्य सोबत घ्यायचं, काय गोष्टी फॉलो करायच्या याबाबत अनेकांना कन्फूजन असतं. तुम्हीही मान्सून ट्रीपसाठी प्लॅन करत असाल तर त्यापूर्वी खालील गोष्टी अवश्य करा. यामुळे तुमचा प्रवास सुखकर आणि आनंददायी होण्यासाठी मदत होईल.
पावसाचा अंदाज पहा :
पावसाळ्यात फिरायला निघण्यापूर्वी जिथं जाण्याचा विचार करत त्या ठिकाणचा हवामान आणि पावसाचा अंदाज नक्की तपासा. याच्या मदतीने तुम्हाला मुसळधार पाऊस, ढगफुटी, भूस्खलन, दरड कोसळणे अशा नैसर्गिक आपत्तींची माहिती मिळू शकते. कोणत्या ठिकाणी कधी जायचे आणि कधी नाही हे तुम्हाला कळून येईल.
प्रवासात अवजड सामान टाळा :
पावसाळ्यात फिरायला जाण्यापूर्वी बॅग पॅक करताना फक्त आवश्यक वस्तूच पॅक करा. तुमची बॅग अधिकाधिक कशी हलकी योईल यावर लक्ष द्या. यामुळे तुम्हाला ट्रेकिंगला गेल्यानंतर किंवा धबधब्याच्या स्थळी जाताना सामानाचे ओझे होणार नाही. तुम्ही तुमच्या ट्रीपचा आनंद घेऊ शकता.
कपडे आणि वस्तूंबाबत काळजी घ्या :
पावसाळ्यात असेच कपडे सोबत घ्या, जे लवकर सुकतात. किंवा भिजले तरी खराब होणार नाहीत. घट्ट आणि अंगासोबत बसणारे कपडे वापरणे टाळा. शॉर्ट ड्रेस, शॉर्ट पॅन्ट, हाफ पॅन्ट टाळा. स्पोर्ट्स वेअर लाँग पॅन्ट, फुल स्लीव्हज टीशर्ट घातल्यास अतिउत्तम. याशिवाय पायात बूट घाला. चप्पल, सॅन्डेल यामुळे तुम्हाला ट्रेकिंगचा आनंद घेता येणार नाही. मोबाईल, कॅमेरा आवश्यक असल्याच कॅरी करा. या दोन्ही गोष्टी कॅरी केल्यास त्यासोबत पॉवर बँक आवश्य घ्या. सर्व गॅझेट फक्त वॉटरप्रूफ बॅग किंवा हवाबंद झिपलॉकने पॅक करा.
स्ट्रीट फूड टाळा :
पावसाळ्यात कुठेही गेलात तर जेवणाची पूर्ण काळजी घ्या. रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाऊ नका, कारण त्यामुळे अन्न विषबाधासारख्या समस्या उद्भवू शकतात. तुमच्यासोबत शक्य तितके सुके अन्नपदार्थ कॅरी करा. वाटेत कुठचेही पाणी पिणे टाळा. तुमची पाण्याची बाटली सोबत ठेवा. यामुळे तुम्ही आरोग्याच्या अनेक समस्या टाळू शकता आणि तुमची ट्रिप खराब होणार नाही.